सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२
मनमानी करणार्या अधिकार्यांची आयुक्तांमुळे पंचाईत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यपद्धतीमुळे घाईगडबडीत कामांना मंजुरी मिळवून मनमानी करणार्या अधिकार्यांची पंचाईत झाली आहे. मागील आयुक्तांना ज्या परिस्थितीत येथून जावे लागले ते पाहून विद्यमान आयुक्त सिंह यांनी योग्य तो बोध घेतला आहे. ते केवळ अधिकार्यांच्या टीप्पणीवर अवलंबून न राहता बहुतेक सर्व फाईल्स जातीने अभ्यासत आहेत आणि त्यानंतरच त्यावर सह्या करत आहेत. याशिवाय त्यांनी पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. नागरिकांशी सौजन्याने वागा, विकासकामांचा दर्जा नीट राखा, कामात समन्वय ठेवा आणि नियमानुसार व शिस्तीतच काम करा असे आदेश दिले असून कामचुकार आणि मनमानी करणार्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे. आयुक्त शेखर सिंह हे प्रत्येक फाईल बारकाईने पहातात. त्यावर आलेल्या शंकांचे संबंधित अधिकार्याकडून निरसन करून घेतात आणि मगच फाईलवर सही करतात. अशा शिस्तबद्ध कामाची सवय नसलेल्या महापालिकेच्या काही अधिकार्यांना याची सवय नसल्याने त्यांची चुळबूळ सुरू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा