मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२
अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली
अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची महापालिकेतून पुन्हा रेल्वे सुरक्षा विभागात बदली झाली आहे. त्यामुळे उपायुक्त स्मिता झगडे यांना अतिरिक्त आयुक्तपदाची लॉटरी लागली आहे. ढाकणे यांच्याबरोबरच सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी यांचीही बदली झाली आहे. विकास ढाकणे मूळचे भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी होते. काही काळ एका मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची बदली पिंपरी महापालिकेत झाली. 12 फेब्रुवारी 2021 रोजी ते महापालिकेत रुजू झाले. यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांचे ते विश्वासू मानले जात. राज्यातील सत्तांतरानंतर पाटील यांची तडकाफडकी उचलबांगडी झाली. त्यापाठोपाठ ढाकणे यांचीही अन्यत्र बदली होणार अशी अटकळ महापालिका वर्तुळात बांधली जात होती. त्या प्रमाणे मंगळवारी त्यांची बदली झाली. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी मंगळवारी काढले. ढाकणे यांच्या सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे प्रत्यार्पित केल्या आहेत. तर, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, पुणे आणि भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांची प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, ठाणे या पदावर बदली झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा