रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मतदार याद्यात बोगस मतदार! उच्च न्यायालयात याचिका दाखल

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मतदार याद्यात बोगस मतदार! उच्च न्यायालयात याचिका दाखल तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुमारे 30 टक्के बोगस मतदार असून या प्रकरणी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने प्रशासनाला याबाबत 18 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दाभाडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, नगरपरिषदेने अंतिम मतदार यादी 25 जुलैला प्रसिद्ध केली होती. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण मतदार 5 हजार 578 मतदारांची नोंदणी होती. यास दाभाडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर यामधील 995 नावे कमी करण्यात आली. त्यामुळे 4 हजार 583 नावे असलेली मतदार यादी प्रसिद्ध केली. या प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीमध्ये बाजूच्या प्रभागातील नावे, अपुरी नावे, बाजूच्या गावांमधील रहिवाशांची नावे, मयत झालेल्या व्यक्तीची नावे, एका मतदाराची अनेक प्रभागात असलेली नावे आदी बाबी पुराव्यानिशी अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांनी हायकोर्टामध्ये दाखल केल्या असून याबाबत दिनांक 18 ऑक्टोबरपर्यंत नगर परिषदेचे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्याकडे अहवालाची मागणी आदेशाद्वारे केली असल्याची माहिती दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दाभाडे पुढे म्हणाले, एका प्रभागामध्ये जर एवढी बोगस नावे असतील तर तळेगावातील 13 प्रभागांमध्ये किती असतील तसेच मावळ तालुक्यामध्ये होणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतदार यादीमध्ये देखील बोगस नावाचा सुळसुळाट झाला असेल, याची खातरजमा करावी व या लोकशाहीला घातक प्रवृत्तीला कोण खतपाणी घालत आहे, याचा शोध घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा