राहुल कलाटे व प्रशांत शितोळे यांचे आयुक्तांवर शरसंधान
पिंपरी : महापालिका निवडणूक जवळ आली असल्याने गरज नसलेल्या ठिआणी रस्त्यांची कामे काढून पालिकेतील सत्ताधारी भाजप निवडणूक निधी जमविण्यासाठी खटाटोप करत आहे; अशी टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली आहे.
कलाटे आणि शितोळे यांची माध्यमप्रतिनिधींशी बोलताना हा आरोप केला आहे. ते म्हणाले, शहरातील काही रस्त्यांच्या कामासाठी ६२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर यासाठी सल्लागार नेमला आहे. सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईननुसार विकसित करण्यासाठी १४ कोटी ७४ लाख ६३ हजार ६०४ रुपये, डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता करण्यासाठी १६ कोटी २७ लाख २७ हजार ४७४ रुपये आणि औंध ते रावेत रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी ३० कोटी ९६ लाख ४६ हजार ११२ खर्चाची अशी सुमारे ६२ कोटी रुपयांची ही कामे आहेत. औंध रावेत रस्ता चांगला आहे. रस्त्यावर एकही खड्डा नाही. रस्त्याचे आयुष्यमान किती हे तपासावे. आणखी काही वर्षे या रस्त्याचे काम करण्याची गरज नाही. असे असतानाही ही कामे काढण्यात आली आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निधी गोळा करण्याकरिता भाजपचा खटाटोप चालला असून याला प्रशासन साथ देत आहे. आयुक्तही भाजपच्या दबावाला बळी पडले आहेत; असा आरोप यावेळी कलाटे, शितोळे या दोघांनी केला. तसेच याप्रकरणी राज्य सरकारकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिकेच्या बीआरटीएस विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे यांच्यावर भाजपला निवडणूक निधी गोळा करुन देण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचा आरोप यावेळी कलाटे यांनी केला.
ते म्हणाले, कामाची गरज नसल्याबाबत वेळोवेळी पत्र देऊनही निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सल्लागार नेमला आहे. सत्तेच्या जोरावर सगळा कारभार केला जात आहे. मनमानी पद्धतीने कामे केली जात आहेत. बीआरटीएस विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे यांच्यावर भाजपला निवडणूक निधी गोळा करुन देण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांची बांधकाम विभागात बदली होऊनही ते रुजू होत नाहीत. अनेक कामात ते भागीदार असूनही त्यांना अभय दिले जाते. भाजप त्यांना पाठिशी घालते. आयुक्त सत्ताधा-यांच्या दबावाला बळी पडत आहेत. आयुक्त एवढे बळी पडतील असे वाटले नव्हते.
निवडणूक निधी जमविण्यासाठी आवश्यकता नसतानाही रस्त्याची कामे; सत्ताधा-यांना प्रशासनाची साथ
Reviewed by ANN news network
on
१/०८/२०२२ १०:१०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: