पिंपरी : महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात दिली, ते भस्मासुर आपल्या खिशात हात घालून पैसे खाण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शहर वाचवायचे असेल तर खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी केले. विरोधकांनी काही दिवस हवा केली. आता त्यांची हवा काढायची आहे. त्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद पाहिजे, असे देखील लांडे म्हणाले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चला हवा येऊ द्या’, या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोसरीतील गाव जत्रा मैदानात झालेल्या या कार्मक्रमात माजी आमदार विलास लांडे बोलत होते. या वेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी महापौर योगेश बहल, मोहिनी लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे, विक्रांत लांडे, नाना काटे, रवी लांडगे, योगेश गवळी, वैशाली घोडेकर,अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, विराज लांडे, संजय उदावंत, विजय लोखंडे, निवृत्ती शिंदे, नंदू शिंदे, दीपक नकोरे, सुरेखा लोंढे यांच्यासह पक्षाचे आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
लांडे म्हणाले की, शहरातील विकासकामे राष्ट्रवादीने केली आहेत. त्यामध्ये भोसरीतील स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, महापालिका रुग्णालय, लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी यासह आळंदीतील थोरल्या पादुका शिल्प आदींसह असंख्य कामाचा समावेश आहे. या कामाच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला आहे. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुल ९० कोटी रुपये निधी खर्च करून, आम्ही सर्व सोयींनी युक्त असा केला. मात्र सध्या त्या उडाणपूलाखाली महापालिका सत्ताधारी सुशोभीकरणाच्या नावाखाली ३८ कोटी रुपयांचे काम करत असल्याचा दिखावा करत आहेत. त्या ठिकाणी विरोधक सोने बसविणार आहेत का ? असा परखड सवाल लांडे यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवड शहराची धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असताना ते चांगले काम करत होते. मात्र तरीही शहरवासियांनी महापालिका निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला. सध्याच्या महापालिका सत्ताधा-यांमुळे शहराची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत चांगला विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सत्तेत आणूयात, असे आवाहन, माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना केले.
महापालिकेतील ‘भस्मासुराकडून’ पैसे खाण्याचे काम सुरु : माजी आमदार विलास लांडे यांचा विरोधकांना टोला
Reviewed by ANN news network
on
१२/२४/२०२१ १०:५५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: