पिंपरी : गेले अनेक दिवस निद्रावस्थेत असलेले पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला बुधवारी जाग आली. शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाई विरोधात शहर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी केली.
भाऊ, दादा पैसे खाई... शहराला आमच्या पाणी नाही..., ओ माई पाणी नाही..., सत्ताधारी भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय..., शहरवासीयांना दररोज पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका अपर्णा डोके, संगिता ताम्हाणे, शमीम पठाण, फजल शेख, वर्षा जगताप आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
महापालिकेने नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यानंतर तो कायम ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने नोव्हेंबरअखेरपासून टप्या टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल असे म्हटले होते परंतु हे आश्वासन वास्तवात उतरू शकले नाही याला महापालिकेतील सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्यावेळी केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा