शनिवार, २५ डिसेंबर, २०२१
पिंपरी चिंचवड महापालिकेचा आता व्यावसायिक कबड्डी संघ
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक कबड्डी संघाची स्थापना करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे क्रीडाविश्वातून स्वागत होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. भाजपा नगरसेवक आणिङ्क फ ङ्कप्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेचा व्यावसायिक कबड्डी संघ असावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समितीकडून तसे धोरण ठरवण्यात आले.
स्थानिक गुणवंत कबड्डीपटूंना पुणे, मुंबईसह परराज्यातील कंपन्यांकडे नोकरीसाठी व्यावसायिक संघात स्थान मिळवावे लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमधील खेळाडूंना संधी मिळण्यासाठी व्यावसायिक संघ तयार करावा, असा प्रस्ताव ठेवला होता.
क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी या प्रस्तावावर सूचक म्हणून, तर नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्काराची घोषणा
महापालिका सर्वसाधारण् सभेत मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, आगामी काळात पिंपरी चिंचवड महापालिका सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्काराची घोषणा करणार आहे. त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रतिभावान खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि मार्गदर्शकांना गौरविण्यात येणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार धोरणही तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अ,ब,क वर्ग व्यायामशाळांबाबतही धोरण तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे, मुले आणि मुलांसाठी स्वतंत्र व्यावसायिक कबड्डी संघ तयार करण्यात येणार असून, त्याचे धोरण ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना सोपवण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा