धक्कादायक! पिंपरी चिंचवड शहरात 6 ओमिक्रॉनचे रुग्ण


पिंपरी : 
पिंपरी चिंचवड  शहरात ओमिक्रॉनचे सहा रुग्ण आढळल्याची माहिती आहे.  राज्याच्या कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून  यामुळे  पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढली आहे.
हे वृत्त हाती आले तेव्हा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची आणि आयुक्तांची तातडीची बैठक सुरू होती. शहरातील संक्रमण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कशा आणि कोणत्याप्रकारे कराव्यात यावर याबैठकीत सुरू असल्याची माहिती  महापालिकेच्या जबाबदार अधिकार्‍याकडून मिळाली असून थोड्याचवेळात याबाबत महापालिका प्रशासन अधिकृत पत्रक प्रसिद्धीस देणार आहे.
राज्य नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. या सहा जणांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे निकट सहवासित आहेत.
नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे. या तिघींच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कसलीही लक्षणे नाहीत.
या सहा जणांपैकी तिघे हे 18 वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 30 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

धक्कादायक! पिंपरी चिंचवड शहरात 6 ओमिक्रॉनचे रुग्ण धक्कादायक! पिंपरी चिंचवड शहरात 6 ओमिक्रॉनचे रुग्ण Reviewed by ANN news network on १२/०५/२०२१ ०७:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".