एसटीच्या संपास कामगार संघटना कृती समितीचा पाठिंबा
पिंपरी : एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात प्रवाशांना अहोरात्र सेवा दिली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये एसटीच्या कर्मचा-यांबाबत सहानुभूती आहे. 28 ऑक्टोबर पासून आजपर्यंत सुरु असणा-या संपामुळे राज्यातील जनतेला वेठीस धरल्यासारखे झाले आहे. यामुळे शासनाच्या महसूलावर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, ग्रामीण, निमशहरी भागातील नागरिकांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. महाविकास आघाडी सरकारने आणि एसटी महामंडळाच्या कर्मचारी प्रतिनिधींनीही आता तुटेपर्यंत ताणू नये तसेच या संपावर लवकर तोडगा काढून कामगारांना व नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.
कामगार संघटना कृती समितीच्या वतीने मंगळवारी (दि. 16 नोव्हेंबर) वल्लभनगर येथिल आगार व्यवस्थापकांना पत्र देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते मनोहर गडेकर, ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, वसंत पवार, श्रीकांत महानगरे, सिद्दीक शेख आदी उपस्थित होते.
या पत्रामध्ये पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची अतिशय भीषण अशी कोंडी गेले काही वर्षे सुरू आहे. एका बाजूने खाजगी वाहतुकीच्या रूपाने एसटी महामंडळाचा नफ्यातील मार्गांचा व्यवसाय खाजगी क्षेत्राकडे वळवला गेला आहे. मात्र तोट्यातील मार्ग एसटी महामंडळाला चालवावे लागत आहेत. याबाबत यापूर्वीच्या भाजपा सरकारने एसटी महामंडळ मोडीत काढण्यासाठी पद्धतशीरपणे हालचाली केल्यामुळे एसटी महामंडळ अधिकच अडचणीत आले हे सर्वज्ञात आहे.
या पार्श्वभूमीवर आघाडीच्या सरकारने खालील पावले त्वरित उचलावीत. या मुद्द्यांबाबत आम्ही कामगार संघटना कृती समिती म्हणून एसटी कर्मचार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या संपात सहभागी झाल्यामुळे शेकडो कर्मचा-यांना महामंडळाने आजपर्यंत निलंबित केले आहे. अशा कर्मचा-यांना सशर्त पुन्हा रुजू करुन घ्यावे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला द्यावे. सातवा वेतन आयोग हा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना द्यावा. महामंडळाच्या जागा डेपो यांचा विकास करण्यासाठी खासगीकरणाचा व्यतिरिक्त अन्य सर्व मार्गांचा तातडीने विचार करावा. एसटीच्या गाड्या खरेदी आणि मार्ग विकासाचा व्यावसायिक तत्त्वावर अभ्यास करून तातडीने पावले उचलावीत याबाबत महामंडळाला अधिकार द्यावा. एसटी महामंडळाची सेवा अत्याधुनिक करण्यासाठी अंमलबजावणी करावी. तात्पुरते, हंगामी, कंत्राटी असे सर्व वर्गातील कर्मचारी रीतसर कायम करा. कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या सर्व गाड्या स्वतः एसटी महामंडळाने चालवाव्यात. कंत्राटदारांची एसटीच्या सेवेमधून हकालपट्टी करावी तसेच प्रवाशांना तत्पर आणि चांगली सेवा देण्यासाठी नियोजनबध्द धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशीही मागणी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा