मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

दररोज पाणी पुरवठ्यासाठी मनसेचे आंदोलन

पिंपरी : शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करावा अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

पालिकेतील मनसे गटनेता सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरसचिव रुपेश पटेकर, महिला अध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, श्रद्धा देशमुख आदी मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 “पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना फसवू नका, फसवू नका”, “पाणी द्या, पाणी द्या, 24 तास पाणी द्या”, “प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

महापालिकेचे मागील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे.

नोव्हेंबर 2021 पासून दररोज पाणीपुरवठा केला जाईल असे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते. पण, नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला. तरी, पाणीपुरवठा दररोज सुरू केला जात नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा