आळंदी : आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेची लगबग सुरू आहे. माऊलीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने आळंदीत दाखल होत आहेत, त्यांची चोख व्यवस्था व्हावी यासाठी संस्थान सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, डॉ. अभय टिळक यांचेसह विश्वस्त कमेटी यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे मंदिर व्यवस्थापनाने तयारी केली आहे.
आळंदी नगरपरिषद, महसूल, पोलीस, आरोग्य सेवा, वीज वितरण सेवा यांच्यात सुसंवाद साधून आळंदी देवस्थानच्या मंदिरातील प्रथा परंपराचे पालन यात्रा काळात होणार आहे. श्रीचे संजीवन समाधी दिन सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेवून सेवा सुविधांसाठी प्रभावी कामकाज शासनाचे सूचनादेशा प्रमाणे करण्यात आले आहे. आळंदीतील आढावा बैठकीत खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्तिकी यात्रेतील तयारी देवस्थानाने केली आहे. यात श्रीचे सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम नियोजन करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था, सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, पोलिस बंदोबस्त, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, देवस्थान व इंद्रायणी नदी घाटावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील यावर्षी करण्यात आली आहे. आळंदी पोलीस, खेड महसूल, आळंदी ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवा आणि आळंदी नगरपरिषद प्रशासन यांचे दिलेल्या सूचनांप्रमाणे कामकाज सुरु आहे.
४ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम या निमित्त होत आहेत. श्री गुरु हैबतराव बाबा यांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास सुरूवात झाली. या काळात आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद, हरिपाठ, पालखी मिरवणूक, नगरप्रदक्षिणा, श्रींचा रथोत्सव परंपरेने धार्मिक पूजा, अभिषेक आदि कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(दि.३०) कार्तिकी एकादशी निमित्त पहाट पूजा,( दि.१) ला द्वादशी, श्रींचा ७२५ वा संजीवन समाधी दिन सोहळा (दि.२) होणार आहे. या निमित्त संत नामदेवरायांचे वंशज नामदास महाराज कीर्तन, घंटानाद व समाधीवर पुष्पवृष्टी होईल. सोहळ्याची सांगता पालखीची नगरप्रदक्षिणा व छबिना मिरवणूक, आतषबाजी ने होणार आहे.
आळंदी नगरपरिषदेने भाविकांना तसेच नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देण्यासाठी उपाययोजना केल्या असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष आदित्य घुंडरे यांचेसह पदाधिकारी याकडे जातीने लक्ष देत आहेत.
आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी भाविकांची गर्दी
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ १०:११:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: