पिंपरी : संविधानदिनाचे तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवारी निगडी प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यान, पेठ क्रमांक 28 येथे नगरसेविका शैलजा मोरे यांच्या हस्ते संविधानफलकाचे अनावरण करण्यात आले.
माजी महापौर आर.एस.कुमार, सामाजिक कार्यकर्ते सलिम शिकलगार, विजय शिनकर, डॉ. गुणवंत चिखलीकर, सूर्यकांत मुथियान यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शैलजा मोरे म्हणाल्या की, देशातील लोकशाही अबाधित राखण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याइतकीच भारतीय संविधान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या पिढीने हे महत्त्व भावी पिढीच्या मनावर ठसवले पाहिजे!
आर. एस. कुमार म्हणाले, संविधानामुळे देशातील सर्वधर्मियांना समान न्याय आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळते. संसदेत स्पष्ट बहुमत असल्याशिवाय संविधानातील तरतुदींमध्ये बदल करता येत नाहीत!
सूर्यकांत मुथियान यांनी संविधानाविषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी संविधानाचे सामुदायिक वाचन करून भारतमाता, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला.
सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघ, एकता ज्येष्ठ नागरिक संघ, पंचशील सोसायटीचे अध्यक्ष ओव्हाळ, मनोज देशमुख, अनुप मोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात परिश्रम घेतले. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुसंगती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.
निगडी येथे संविधानफलकाचे अनावरण
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ ०३:०७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: