लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग चौथ्यांदा अव्वल कामगिरी करत देशात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे . राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 20 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे लोणावळा नगरपरिषदेचा सन्मान करत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . या पुरस्काराचे खरे मानकरी असलेल्या शहरातील प्रत्येक नागरिकांचा हा सन्मान असून आम्ही केवळ निमित्तमात्र होतो अशा शब्दात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी शहरातील सर्व नागरिकांचे आभार मानले .
स्वच्छ सर्वेक्षणच्या यादीमध्ये लोणावळा नगरपरिषदेचे नाव घोषित होताच लोणावळा नगरपरिषदेने सभागृहात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते . मात्र हा सत्कार सोहळा नगरपरिषद लोकप्रतिनिधी यांचा नव्हता तर शहराला स्वच्छ बनविण्यासाठी मनापासून साथ देणारे नागरिक व विविध सामाजिक संघटना , नगरपरिषद कर्मचारी यांचा होता . सभागृहात नगराध्यक्षा सुरेखा जाधव , उपनगराध्यक्षा सुर्वणा अकोलकर , मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते शहरातील विविध संघटना , पत्रकार संघ , असोसिएशन यांना सन्मानित करण्यात आले .
यावेळी शहरवासीयांना संबोधित करताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या , चार वर्षापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण अभियान आले त्यावेळी त्यामध्ये आपला निभाव लागेल का , याबाबत साशंकता होती . मागील पंचवार्षिक काळ व त्यापुर्वी देखील सभागृहात दोन दोन तास केवळ कचरा समस्यांवर वादळी चर्चा होत असे ऐवढा गहण हा प्रश्न होता . मात्र शहरवासीयांना आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही शिवधनुष्य उचलण्याचा संकल्प केला . सर्व नगरसेवक तसेच प्रशासन रस्त्यावर उतरले. नागरिकांनी देखील वेळोवेळी केलेल्या आव्हानाला साथ दिली . दंडात्मक कारवाया केल्या मात्र शहर स्वच्छ होत असल्याने नागरिकांनी देखील कारवायांना विरोध केला नाही . याचे फलित म्हणून पहिल्याच वर्षी नगरपरिषदेने सातवा क्रमांक मिळविला . त्यानंतर अनुक्रमे दुसरा , तिसरा व परत दुसरा क्रमांक मिळवत कामात सातत्य कायम ठेवले .
नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या पुढच्या वेळी आपला प्रथम क्रमांक येईल यात शंका नाही . मात्र मला केवळ शहराला स्वच्छ स्पर्धेत नंबर मिळवून द्यायचा नाही तर लोणावळा शहर कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर बनवायचे आहे . याकरिता नागरिकांनी आजपर्यंत जशी साथ दिली तशीच भविष्यात द्या , घरातील कचरा ओला व सुका असा वर्गीकरण करत घंटागाडीत द्या . व्यापारी वर्गाने देखील दुकानातील कचरा घंटागाडीत द्यावा . पर्यटकांनी लिटर बीन व बॉटल कलेक्टरचा वापर करावा . शहरातील प्रत्येक नागरिका याचे काटेकोरपणाने पालन केल्यास शहर कायमस्वरूपी स्वच्छ राहिल .
चौकट :
पर्यटन विकासाला गती देणार
लोणावळा शहरातील रस्ते , पाणी , विज , गटारे ह्या सर्व मुलभुत सुविधा व महत्वाची विकासकामे पुर्ण झाली आहेत . पुढील काळात येथील पर्यटन वाढीसाठी काम करायचे आहे . लोणावळा शहराची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने शहरात पर्यटनासाठी रोप वे , प्रकल्प , खंडाळा व वलवण बोटिंग क्लब , तुंगार्ली धरणावर मनोरंजन नगरी , उद्यानांचे सुशोभिकरण व सेल्फी पाँईट ही कामे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला . यामधून लोणावळा शहराच्या अर्थकारणाला गती देत प्रत्येक हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले .
लोणावळा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात दुसरे
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ ०१:१६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: