पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 70 कोटी रुपये खर्चून टॅब्लेट पीसी (टॅब) देण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता दिसू लागली आहे. माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल आणि शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.
बहल आणि कलाटे यांनी मंगळवारी याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.
टॅब वापराबाबत शिक्षक आणि विद्यार्थी अनभिज्ञ
बहल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शाळेत सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना टॅब चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. विद्यार्थीही टॅबच्या वापराबाबत अनभिज्ञ आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांना गेल्या पावणे दोन वर्षांत सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षण मंडळातील सदस्यांनी प्रशिक्षण देण्यासारखा तरी निर्णय घेणे अपेक्षित होते.
विद्यार्थ्यांच्या आडून भ्रष्टाचार
केवळ खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करणे आणि त्यातून भ्रष्टाचार करणे असा प्रकार महापालिकेमध्ये सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आडून हा 70 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा जो डाव सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, महापालिका प्रशासनातील अधिकारी व ठेकेदाराने आखला आहे तो तात्काळ हाणून पाडावा व टॅब खरेदीचा निर्णय रद्द करण्यात यावा.
शाळा सुरू झाल्या आता टॅब कशासाठी?
सध्या ऑफलाईन शाळा सुरू झालेल्या असल्याने तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी झाल्यामुळे टॅब खरेदीचा निर्णय तात्काळ रद्द करावा. आपण टॅब खरेदीद्वारे होणारा भ्रष्टाचार न रोखल्यास तसेच त्याबाबतची निविदा प्रसिद्ध करून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपातून जमा झालेल्या रक्कमेची उधळपट्टी न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल तसेच त्याबाबत न्यायालयात धाव घेऊन आपणाविरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
शिक्षण समितीत मनमानी कारभार
तर शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीमध्ये मनमानी कारभार सुरु आहे. चुकीच्या पद्धतीने जनतेच्या पैशाची लुट करून ठेकेदार हिताचे धोरण राबविले जात आहे.
शाळा सुरू होताना टॅब खरेदीचा घाट
शाळा भरण्यास सुरुवात होणार आणि टॅब खरेदीचा घाट घातला जात आहे. वास्तविक पटसंख्येबाबत विचारणा करूनही शिक्षण समितीकडून माहिती दिली जात नाही. तसेच मनपा शाळेत शिकणारी मुले ही गरीब कुटुंब व प्रतिकूल परिस्थितीतून आलेली दिसतात. या ऑनलाईन शिक्षणासाठी आपण त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे की नाही. हे देखील शिक्षण समितीने मागील २ वर्षात तपासले नाही.
ठेकेदारांची घरे भरण्यास विरोध
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मदत करण्यात आमचा विरोध नव्हता नाही आणि नसेलही. मात्र, मुलाना साहित्य देण्याच्या नावाखाली ठेकेदारांची घरे भरण्यास आणि जनतेच्या पैशांची होणारी लूट यास विरोध आहे. त्यामुळे टॅब खरेदी करताना शहर व विद्यार्थी हिताचा विचार करुन आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी करण्यास राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांचा विरोध
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ १२:५२:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: