एसटीच्या संपामुळे छोट्या व्यावसायिकांची उपासमार



खेड:एसटी बसस्थानक व परिसरातील जनरल स्टोअर्स, बेकरी, दुग्ध पदार्थ विक्री केंद्र, रसवंती गृह, फळ विक्रेते, बुक स्टॉल, उपहारगृह आदी छोट्या व्यावसायिकांना गतवर्षीच्या  एप्रिल महिन्यापासून सातत्याने दुकाने बंद ठेवण्याची परिस्थिती उद्भवल्याने उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी २० एप्रिल पासून कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा यावर्षी मार्च पासून कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बाजारपेठा बंद होत्या तर एसटी वाहतूकही ठप्प झाली होती. एसटी बसस्थानकात हजारो रुपये अनामत रक्कम व दरमहा भाडे भरून स्वयंरोजगार करणाऱ्या या व्यावसायिकांना सद्यस्थितीत सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे. एसटी बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशी ग्राहकांवर या सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय अवलंबून असल्याने दिवसभर दुकाने उघडून ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ दुकानचालकांवर आली आहे. एसटी बसस्थानकातील मोकळी जागा एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून भाडे तत्वावर व्यावसायिकांना देण्यात येते. सर्वसाधारणपणे त्या त्या शहरातील शासकीय रेडी रेकनर प्रमाणे हे भुईभाडे आकारले जाते. किमान पाच हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत हे भाडे जागेच्या क्षेत्रफळानुसार आकारले जाते. कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक महिन्यांचे भाडे एसटी प्रशासनाने व्यावसायिकांकडून आकारले आहे. दरम्यान बाजारपेठेतील अनेक दुकाने भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक मालकांनी माणुसकीच्या भावनेतून पन्नास टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. एसटी बसस्थानकात व्यवसाय करणारे बहुतांश व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढून आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र पहिल्यांदा कोरोना व आता संप यामुळे या सर्व छोट्या व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळ व छोटे व्यावसायिक या दोघांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तर प्रवासीवर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

एसटीच्या संपामुळे छोट्या व्यावसायिकांची उपासमार एसटीच्या संपामुळे छोट्या व्यावसायिकांची उपासमार Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".