पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन; "समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न सुरू, कार्यकर्त्यांची लढाई सोपी नाही" छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!


ओतूर / पुणे (दि. २१ नोव्हेंबर २०२६): महात्मा जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक शाळेचा वारसा लाभलेल्या ओतूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान (ओतूर) यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडले. ओतूर येथील मार्केट यार्डमधील 'सत्यशोधक नगरी' येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते तसेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचा शुभारंभ झाला. उद्घाटन सत्रात बोलताना छगन भुजबळ यांनी समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांची लढाई सोपी नसून ती आंदोलनाच्या माध्यमातून लढावी लागेल, असे प्रतिपादन केले. या अधिवेशनासाठी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातून सुमारे दीड ते दोन हजार सत्यशोधक कार्यकर्ते व अभ्यासक उपस्थित राहिले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक भाऊसाहेब कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, ओतूर या मूळ शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमांची लेझिम पथक व पथनाट्यांच्या सादरीकरणासह भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व सहभागी मुख्य व्यासपीठ असलेल्या सत्यशोधक नगरी, मार्केट यार्ड येथे दाखल झाले. सकाळी ११ ते १ या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडला; यावेळी स्थानिक कष्टकरी प्रतिनिधी स्त्री व पुरुष श्रमिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते 'महात्मा फुले यांचे अमर जीवन' आणि 'शिवनेरीचे वैभव' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. शाहीर स्वप्नील गायकवाड यांनी पोवाडे सादर केले; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले, तर आभार डॉ. विशाल तांबे यांनी मानले. या प्रसंगी डॉ. सुधीर तांबे, आमदार शरद सोनवणे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उत्तम पाटील, अनिल तांबे, नरेंद्र डुंबरे, सुधाकर डुंबरे, नंदूशेठ भोर, संजय नलावडे, बापूसाहेब भुजबळ, संजय काळे, दुर्गा तांबे, सत्यशील शेरकर, सर्जेराव काळे, बाळासाहेब म्हेत्रे, तुषार थोरात, शरद बाविस्कर, ॲड. निशा शिवूरकर, रामदास डुंबरे, विकास लवांडे, बाळासाहेब जाधव आणि डॉ. मंगेश आमले आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठी समाजक्रांती केली आणि माणसाने माणसासारखे वागले पाहिजे हा प्रवाहाविरुद्धचा विचार समाजासमोर आणला. महात्मा फुले यांचा विरोध ब्राह्मण्यवाद आणि अंधश्रद्धेला होता; मात्र आजही महिला वर्ग अंधश्रद्धा पूर्णपणे सोडायला तयार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुण्यात अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या हजारो महिला समोरच असलेल्या भिडे वाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेत मस्तक टेकवत नाहीत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संघर्षावरील मालिकांपेक्षा सासू-सून मालिकांना अधिक पसंती दिली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने ते पुन्हा पुढे नेण्यासाठी ताकद लावावी लागेल, तसेच महिलांना देवीच्या रूपात न पाहता बरोबरीचे स्थान व जबाबदाऱ्या दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशाला सामर्थ्यवान बनवायचे असल्यास सत्यशोधक विचार आत्मसात करावा लागेल, असे सांगितले. बुद्ध, चार्वाक आणि वारकरी संप्रदायाने विद्रोही व प्रबोधनाचे विचार दिले असून या विचारांची चळवळ पुढे नेत संविधान जपले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फुले दांपत्याचे विचार आचरणात आणण्यात महाराष्ट्र कमी पडला का, याचा आत्मपरीक्षणपूर्वक विचार करण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळू शकली नाही याचाही विचार व्हायला हवा, असे सांगून या विधानाला इतर कोणताही राजकीय संदर्भ जोडू नये, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले; तसेच महाराष्ट्राने जातीच्या चौकटी व धर्माच्या पुष्पहारात न अडकता सत्यशोधक मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले.

पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात दोन महत्त्वपूर्ण परिसंवाद पार पडले. दुपारी २ ते ४ या वेळेत 'फुले आणि आजच्या शिक्षणाची दशा व दिशा' या विषयावर प्रा. डॉ. उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात प्रा. डॉ. शरद बाविस्कर, प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, किशोर दरक आणि प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी विचार मांडले; सूत्रसंचालन प्रा. भाऊसाहेब चासकर यांनी केले, तर आभार हिरालाल पगडाल यांनी मानले. त्यानंतर दुपारी ४ ते ६ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली 'फुले आणि महिला सक्षमीकरण, समानतेचा नवा संघर्ष' या विषयावर प्रगती बाणखेले, आनंद शितोळे, ॲड. निशा शिवूरकर आणि प्रा. धम्मसंगिनी यांनी सहभाग घेतला; सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. विजय भगत यांनी मानले. सायंकाळी ६ वाजता अपूर्वा सोनार लिखित, निर्मित व दिग्दर्शित 'ज्योतीबाची सावली, सावित्री माऊली' या महानाट्याचे सादरीकरण झाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत ऋचिका खोत लिखित-दिग्दर्शित आणि स्वामीराज भिसे यांच्या संशोधन सहाय्याने साकारलेला 'किर्तावनी : वारी आडवाटांच्या विठोबाची' हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० ते १२ या वेळेत सुभाष वारे यांच्या संयोजनातून 'ओतूर अभियोग, खटला' ही लघुनाटिका सादर होईल, तर दुपारी १२ ते १ या वेळेत ज्येष्ठ लोकसाहित्यिक मा. रा. लामखडे आणि निर्मलकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्यशोधकांच्या विद्यमान वंशजांचा सत्कार के. ई. हरदास यांच्या संयोजनातून होणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत ज्येष्ठ शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली 'फुले आणि वर्तमानातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने' या परिसंवादात डॉ. अजित नवले, अविनाश पाटील, अरविंद खैरनार आणि विवेकानंद पाटील सहभागी होतील (सूत्रसंचालन व आभार : प्रा. डॉ. शिवाजीराव एंडाईत). दुपारी ४ ते ६ या वेळेत संपादक संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्रधर्म : मुक्त चिंतन' या समारोप सत्रात प्रा. डॉ. दीपक पवार आणि मा. रा. लामखडे मार्गदर्शन करतील (सूत्रसंचालन व आभार : राजाभाऊ आवसक). दुपारी ६ ते ६.३० या वेळेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होणार असून प्रा. दत्ता जाधव आभार मानतील; तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित आणि शांती फाउंडेशन, संगमनेर प्रस्तुत 'खेळ मांडियला' हे संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील महानाटक सादर होणार आहे. राज्यभरातून आलेल्या सत्यशोधकांच्या निवासाची व्यवस्था ओझर येथील विघ्नहर देवस्थान आणि लेण्याद्री देवस्थान येथे करण्यात आली आहे.

  • Labels: Satyashodhak Adhiveshan Otur, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat, Amol Kolhe, Mahatma Phule Bicentenary, Pune District News, Junnar News, Astra News Network

  • Search Description: Read the complete report on the statewide Satyashodhak Adhiveshan inaugurated in Otur, Pune on the occasion of Mahatma Phule's birth bicentenary year in the presence of Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat, and MP Amol Kolhe, along with full two-day event schedule.

  • Hashtags: #SatyashodhakAdhiveshan #Otur #ChhaganBhujbal #AmolKolhe #BalasahebThorat #MahatmaPhule #PuneNews #AstraNews

पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन; "समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न सुरू, कार्यकर्त्यांची लढाई सोपी नाही" छगन भुजबळ यांचे प्रतिपादन! पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे राज्यस्तरीय सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन; "समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा प्रयत्न सुरू, कार्यकर्त्यांची लढाई सोपी नाही" छगन भुजबळ यांचे प्रतिपादन! Reviewed by ANN news network on ११/२१/२०२६ ०५:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".