सांगवीतील संविधान शिल्प पाडल्याप्रकरणी आंदोलन तात्पुरते स्थगित, मात्र कारवाईसाठी न्यायालय व प्रशासकीय पातळीवर लढा सुरूच राहणार : नरेंद्र बनसोडे
पिंपरी-चिंचवड: सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याच्या आणि स्मारकाचा काही भाग जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ आयोजित 'संविधान सन्मान निर्धार सभेत' महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आगामी दिवाळी सण लक्षात घेता, आंदोलकांच्या सहमतीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे; मात्र दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत न्यायालयीन आणि प्रशासकीय लढा अधिक तीव्र केला जाईल, असा ठाम इशारा काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आणि मारुती भापकर यांनी मांडलेली भूमिका विचारात घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. या सभेत पीडब्ल्यूडी क्वार्टरच्या जागेवर 'संविधान सृष्टी' उभारण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्या संबंधित कृत्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे बनसोडे यांनी जाहीर केले.
घटनेच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा सविस्तर पाढा वाचताना नरेंद्र बनसोडे म्हणाले की, १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला स्थानिक ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर, १५ ऑक्टोबर रोजी नागरिक या परिसरातून जात असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२२ मध्ये उभारलेले भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प मनमानीपणे हटविण्यात आले. या संदर्भात महानगरपालिकेच्या 'ह' प्रभागातील अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना लेखी पत्र दिले होते. त्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, स्मारकाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मागितला असला तरी कोणतीही प्रशासकीय मान्यता, काम सुरू करण्याचा आदेश अथवा वर्क ऑर्डर नसतानाही हे स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले. देशाच्या आणि संविधानाच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी ही घटना अत्यंत गंभीर असून, संबंधितांवर त्वरित कारवाई व्हावी म्हणून १७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले होते.
पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई न झाल्यामुळे २० ऑक्टोबर रोजी घटनास्थळी पुन्हा बेकायदेशीर बांधकाम सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. सुरुवातीला एफआयआरची प्रत आणि कलमे लपवून ठेवण्यात आली, मात्र २२ ऑक्टोबरपासून संविधान चौकात तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर चौथ्या दिवशी मिळालेल्या एफआयआरच्या प्रतीमध्ये संतोष कांबळे आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. तरीही संबंधित जेसीबी चालक, वाहन आणि ठोस पुराव्यांवर अपेक्षित तपास पोलिसांनी केला नाही. संवेदनशील प्रकरणावर सामोपचाराची बैठक घडवून आणण्याऐवजी आंदोलनाला परवानगी देऊन वेळकाढूपणा करण्यात आला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. संविधानाची प्रास्ताविका हा देशाचा आत्मा आणि नागरिकांचा स्वाभिमान असून ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून संविधानविरोधी प्रवृत्तीविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या व्यासपीठावरून नागरिकांच्या भावनांचा आदर करत केवळ प्रास्ताविकेचे शिल्प न उभारता संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच परिसरातील मोडकळीस आलेल्या पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र' किंवा 'अध्ययन सृष्टी', विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि सामाजिक न्याय विभागामार्फत वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासाठी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कला संचालनालय आणि नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या निर्धार सभेला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, प्रदेश काँग्रेस सचिव अशोकराव मोरे, अभिमन्यू दहीतुले, रवी नांगरे, आपचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप महिला अध्यक्षा कविता कोंडे, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Labels: Pimpri Chinchwad News, Sangvi Constitution Preamble Row, Narendra Bansode, Congress Protest, PCMC, Human Rights, Law and Order
- Search Description: Protest over removal of sculpture from Sangvi Constituent Chowk temporarily suspended due to Diwali; Congress city president Narendra Bansode's determination to continue the court battle.
- Hashtags: #PimpriChinchwad #Sangvi #ConstitutionPreamble #NarendraBansode #PCMC #MaharashtraNews
Reviewed by ANN
on
११/०२/२०२६ ०९:२४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: