पुण्यातील कल्याणी नगर येथील वेलेन्सिया प्रकल्पावर; सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्रकानंतर महापालिकेची कारवाई


पुणे: पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील बहुचर्चित 'वेलेन्सिया' या प्रकल्पात मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त मजले आणि वाढीव बांधकाम केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सनी निम्हण यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे महापालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल करत तातडीने स्थळ पाहणी आणि संयुक्त मोजणीची मागणी केली आहे. सर्व्हे नं. २१३, २१४, २१५/२, सी. एस. नं. २१११, फायनल प्लॉट नं. १८, ५७ मधील या प्रकल्पाला महापालिकेच्या झोन क्र. ४ कार्यालयाने १९ ऑक्टोबर २०२२ रोजीच बांधकाम थांबविण्याचे पत्र दिले होते. तरीही प्रत्यक्षात जागेवर मजल्यांची संख्या, मजलानिहाय क्षेत्रफळ, एफएसआय, टी डी आर, पार्किंग आणि रेफ्युज एरियामध्ये नियमबाह्य तफावत आढळल्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहता, विकासकाने मंजूर आराखड्याला हरताळ फासला असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यावर असे निदर्शनास आले की, कागदोपत्री मंजूर असलेल्या नियमांपेक्षा प्रत्यक्ष बांधकाम खूप मोठ्या प्रमाणावर विनापरवाना व मनमानी पद्धतीने झाले आहे. झोन क्र. ४ कार्यालयाने यापूर्वीच बांधकाम थांबवण्याचे आदेश दिलेले असतानाही प्रत्यक्ष कामात अनधिकृत वाढ सुरूच राहिली. हा अर्ज कोणत्याही वैयक्तिक वादातून किंवा द्वेषातून नसून, पुणे शहरातील वाढत्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि नागरिक सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठीच हा लढा उभारण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते सनी निम्हण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

तक्रारीची तात्काळ दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग क्र. ४ ने या प्रकरणाची गंभीर चोख दखल घेतली आहे. पालिकेने संबंधित मालक तथा विकासक पंकज जतकर यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६० (१ अ) अन्वये २२ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत नोटीस बजावली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम केल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. याप्रकरणी महापालिकेने विकासकाला अधिकृत परवानगी घेतली असल्याबाबतचा खुलासा अवघ्या १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच अनधिकृत बांधकाम आढळल्यास नियमानुसार कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर वर्तवली जात आहे.

या कारवाईमुळे पुणे शहरातील रिअल स्टेट आणि बांधकाम वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने महापालिकेसमोर तब्बल १७ प्रमुख मागण्यांचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये मंजूर पार्किंगच्या जागेत झालेले बेकायदेशीर बांधकाम तातडीने हटवणे, इमारतीचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट व फायर सेफ्टी तपासणी करणे, कलम ५३ व २६० अंतर्गत नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणे आणि या संपूर्ण गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या संबंधित वास्तुविशारद व अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई व प्रस्ताव सादर करण्याचा समावेश आहे. तसेच जोपर्यंत सर्व बाबींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत प्रकल्पाला कोणताही पूर्णत्वाचा दाखला अथवा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी ठाम भूमिका घेण्यात आल्याने महापालिकेची पुढील भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


📢 प्रायोजित जाहिरात (Sponsored Ad)

उत्सव स्पेशल इमेज बॅनर
  • Labels: Pune Municipal Corporation, Kalyani Nagar Construction, Illegal Construction Pune, Sunny Nimhan, Maharashtra News
  • Search Description: Municipal Corporation issues notice to developer against unauthorized construction of Valencia project in Kalyani Nagar, Pune, detailed report.
  • Hashtags: #PuneNews #KalyaniNagar #IllegalConstruction #PMC #MaharashtraNews #UrbanDevelopment
पुण्यातील कल्याणी नगर येथील वेलेन्सिया प्रकल्पावर; सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्रकानंतर महापालिकेची कारवाई पुण्यातील कल्याणी नगर येथील वेलेन्सिया प्रकल्पावर; सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्रकानंतर महापालिकेची कारवाई Reviewed by ANN on ११/०४/२०२६ ०८:३७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".