राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना मोफत धान्य, नर्मदा-तापी वळण योजनेसह स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरणास मंजुरी
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा, जलसंपदा, गृह, महसूल, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि कामगार विभागाशी संबंधित विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्य रेषेखालील व डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रतिमाणशी पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू या प्रमाणात धान्य वितरण होईल.
जलसंपदा विभागाच्या प्रस्तावानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन असून, परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ आणि ११.५० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.
गृह विभागांतर्गत आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापनेस आणि ९० दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याच्या कालमर्यादेस मान्यता देण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली.
महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्हन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम) तसेच प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी एक जिल्हा एक अपील तरतूद लागू करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणेस मंजुरी देण्यात आली. याशिवाय अभिनिर्णय व अपील शुल्काच्या दरांत सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३२ (ब) व ५३ (१अ) मधील सुधारणा विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यास मान्यता मिळाली. तसेच नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन देण्यासही मंजुरी देण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत भोजन, निवास व निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्यास मान्यता मिळाली. शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ (एनसीएएचपी कायदा, २०२१) मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्याच्या सुधारणा विधेयकाच्या प्रारूपास मान्यता मिळाली.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागांतर्गत खाजगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ च्या प्रारूपास आणि विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अधिनियम, १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, १९८९ मधील विविध परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणेस मान्यता देण्यात आली. कामगार विभागाअंतर्गत महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ मधील सुधारणांना, तर सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील सुधारणा अधिनियमास विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी देण्यात आली.
Labels: Maharashtra Cabinet Decisions, Farmers Free Ration, Narmada Tapi Project, MPID Tribunal, Revenue Court System, Maharashtra News
Search Description: Key Maharashtra Cabinet decisions include free grain for 42.30 lakh farmers across 33 districts, Rs 5,548 crore for Narmada-Tapi diversion project, separate MPID tribunal, and revenue court reforms.
Hashtags: #MaharashtraCabinet #MaharashtraNews #FarmersNews #NarmadaTapi #MPID #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२६ ०४:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: