मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणीपुरवठ्यासाठी दीर्घकालीन जलनियोजन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश!

मुंबई / पुणे (दि. २० नोव्हेंबर २०२६): मुंबई महानगर प्रदेशासाठी सन २०५१ पर्यंत आणि पुणे महानगर प्रदेशासाठी सन २०४७ पर्यंतची लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण तसेच उद्योग आणि डेटा केंद्रांची वाढती गरज लक्षात घेऊन एकात्मिक, कालबद्ध व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य दीर्घकालीन जलनियोजन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतील पाणी नियोजन व व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नवीन धरण प्रकल्पांबरोबरच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण, पर्जन्यजल संचयन आणि पर्यायी जलस्रोतांवर विशेष भर देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुंबई शहरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच नगरविकास, जलसंपदा आणि दोन्ही महानगर प्रदेश प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योग आणि डेटा केंद्रांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करणे, पर्यायी जलस्रोत शोधणे आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यात विशेषतः मुंबई व पुणे महानगर परिसरात सुरू असलेले जलप्रकल्प वेळेत पूर्ण करणे, प्रस्तावित प्रकल्पांसाठी वन व पर्यावरणविषयक मान्यता, भूसंपादन आणि पुनर्वसनाची कार्यवाही समांतरपणे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांनी जललेखा परीक्षण (वॉटर ऑडिट) करून पाण्याची आवक, वितरण आणि प्रत्यक्ष देयक आकारणी यांचा अचूक ताळमेळ ठेवावा; व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी स्मार्ट मीटरचा वापर वाढवून महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे (नॉन-रेव्हेन्यू वॉटर) प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या जलनियोजनाचे सादरीकरण केले. या सादरीकरणानुसार, मुंबई महानगर प्रदेशाची सध्याची लोकसंख्या सुमारे २.७५ कोटी असून सन २०५१ पर्यंत पाण्याची एकूण मागणी १६ हजार १३९ दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विद्यमान भातसा, पिंजाळ, तानसा आणि वैतरणा या जलस्रोतांव्यतिरिक्त भविष्यातील मागणी व पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी प्रस्तावित काळू, देहरजी, बाळगंगा, कोंढाणे, खोलसापाडा, शिलार आणि इतर जलप्रकल्पांच्या अंमलबजावणीतील वनजमीन, पर्यावरण मान्यता, भूसंपादन व पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवून कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच सांडपाण्यावर दुय्यम व तृतीयक (टर्शरी) प्रक्रिया, स्वतंत्र वितरण वाहिन्या आणि पर्जन्यजल संचयनाचाही समावेश आराखड्यात करण्यात येणार आहे.

पुणे महानगर प्रदेशासाठी १०० टीएमसी मागणीचे नियोजन व नदीजोड पर्याय 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी पुणे विभागाचे सादरीकरण केले. त्यानुसार, पुणे महानगर प्रदेशाची सध्याची लोकसंख्या सुमारे १.८० कोटी असून सन २०४७ पर्यंत ती ४.१२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या या भागासाठी ३६.९० टीएमसी पाण्याचे आरक्षण उपलब्ध असून प्रत्यक्ष मागणी ४१.६५ टीएमसी इतकी आहे; सन २०४७ पर्यंत ही मागणी सुमारे १०० टीएमसी म्हणजेच ७ हजार ८१६ दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेशासाठी अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुळशी धरणातून सुमारे ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून ते जलवाहिनीद्वारे खडकवासला परिसरात आणण्याच्या पर्यायाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याशिवाय मध्य कोकणातील सावित्री नदी परिसरातील पाणी कुकडी, भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा आणि नीरा खोऱ्यांकडे वळविण्यासाठी 'कोकण खोरे ते भीमा खोरे नदीजोड योजना' हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे सांगून या प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल (पीपीआर) तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पुणे परिसरात सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया करून ते उद्योग, वीज प्रकल्प व डेटा केंद्रांना देणे, दुय्यम प्रक्रिया केलेले पाणी सिंचनासाठी वापरणे, चोवीस तास पाणीपुरवठा योजना, स्मार्ट मीटर आणि जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती या उपायांद्वारे दररोज सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले.

उद्योग व डेटा केंद्रांसाठी एमआयडीसीची स्वतंत्र उपकंपनी 

उद्योग आणि डेटा केंद्रांच्या वाढत्या पाणीपुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पूर्ण मालकीची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या उपकंपनीमार्फत नियमित जलस्रोतांसह महानगरपालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतील प्रक्रिया केलेले पाणी संकलित करून त्याचे वितरण केले जाईल. उपलब्ध प्रक्रिया केंद्रांचे संचालन व देखभाल आणि औद्योगिक पाणीपुरवठा यांची एकत्रित व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक धोरणात्मक तरतुदींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

या आढावा बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पीएमआरडीए महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • Labels: Mumbai Pune Water Planning, Devendra Fadnavis, MMRDA PMRDA Water Supply, Konkan Bhima River Linking, Mulshi Khadakwasla Water Project, Wastewater Recycling Maharashtra, Pune Water Crisis, Astra News Network

  • Search Description: Read the detailed report on Chief Minister Devendra Fadnavis reviewing long-term water supply planning for Mumbai (till 2051) and Pune (till 2047) metropolitan regions, focusing on dam projects, wastewater recycling, smart meters, Mulshi-Khadakwasla feasibility, and Konkan-Bhima river linking.

  • Hashtags: #MumbaiWaterSupply #PuneWaterSupply #DevendraFadnavis #MMRDA #PMRDA #WaterConservation #MaharashtraNews #AstraNews

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणीपुरवठ्यासाठी दीर्घकालीन जलनियोजन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश! मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणीपुरवठ्यासाठी दीर्घकालीन जलनियोजन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश! Reviewed by ANN news network on ११/२१/२०२६ ०६:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".