कोकण रेल्वेच्या ₹४,७०४ कोटींच्या आर्थिक पॅकेजमध्ये महाराष्ट्राला भोपळा; सावंतवाडी टर्मिनस डावलल्याने संताप, आंदोलनाचा इशारा
कोकण रेल्वेच्या पुढील पाच वर्षांच्या विकास आराखड्यानुसार, गोव्यातील पेडणे व जुने गोवा येथील दोन बोगद्यांसाठी १,४८६ कोटी रुपये, कर्नाटकातील ५ स्थानकांवरील लूप लाईन्ससाठी ४२५.५५ कोटी रुपये आणि दोन्ही राज्यांतील ३ क्रॉसिंग स्थानकांसाठी २७१.२२ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातील सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाच्या पायाभूत विकासासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. २७ जून २०१५ रोजी सावंतवाडी टर्मिनसचे भव्य भूमीपूजन झाले होते; परंतु नऊ वर्षांनंतरही हा प्रकल्प निधीअभावी रखडला असून दिलेल्या आश्वासनांना प्रशासनाने हरताळ फासल्याचे समोर आले आहे.
पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सावंतवाडी स्थानकावर दररोज गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. सध्या दुपारी 'सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेस' आणि 'तुतारी एक्सप्रेस' या दोन्ही गाड्या एकाच वेळी सावंतवाडीत उभ्या राहतात. मात्र, टर्मिनसचा विकास न झाल्याने तिथे स्वतंत्र स्टॅबलिंग लाईन किंवा वॉशिंग पिट लाईन उपलब्ध नाही. परिणामी, डब्यांची अंतर्गत स्वच्छता आणि पाणी भरण्याच्या मूलभूत सोयींअभावी सावंतवाडी-मुंबई एक्सप्रेसला थेट चिपळूण गाठावे लागते, तर दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला देखभालीसाठी रिकामी मडगावला पाठवावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यार्डचा विस्तार, अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि रुळांची संख्या वाढवणे गरजेचे असताना, रेल्वे प्रशासन मळगाव बाजूला रुळांच्या नियोजित जागेतच नवीन इमारत बांधत असून मूळ टर्मिनस प्रकल्पच अडचणीत आणला जात आहे.
या कारभाराविरोधात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) आक्रमक भूमिका घेतली आहे. पुनर्रचना पॅकेजमध्ये तातडीने फेरबदल करून सावंतवाडी कोचिंग टर्मिनसचा समावेश करावा, रुळांच्या जागेतील वादग्रस्त बांधकाम त्वरित थांबवावे आणि मडगाव स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी सावंतवाडीत स्टॅबलिंग यार्ड, वॉशिंग पिट लाईन व अतिरिक्त लूप लाईन उभारावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रवासी संघटनेने दिला आहे.
- Labels: Konkan Railway, Sawantwadi Terminus, Maharashtra News, Indian Railways, Railway Budget, Goa Railway, Karnataka Railway, Infrastructure News
- Search Description: Konkan Railway sidelines Maharashtra in ₹4,704 cr package; Sawantwadi terminus gets zero funds while Goa and Karnataka receive major allocations.
- Hashtags: #KonkanRailway #SawantwadiTerminus #MaharashtraRailways #IndianRailways #RailwayNews #KonkanNews #Sindhudurg #RailwayRestructuring
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२६ ०६:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: