येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर भरधाव टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले; ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पुणे: येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) भरदुपारी तीव्र उतारावरून सुसाट आलेल्या आयशर टेम्पोने स्कूल बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना चिरडल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने आयशर टेम्पो (क्रमांक एमएच ०४ एफडी ७६५४) भरधाव येत होता. येवलेवाडीकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसथांब्याजवळ ट्रिनिटी कॉलेजचे २० ते २५ विद्यार्थी बसची प्रतीक्षा करत उभे होते. बसथांब्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर वाहतूक संथ असताना, घाटाच्या उतारावरून वेगाने आलेल्या टेम्पोने पुढे चाललेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेला टेम्पो थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला.
या भीषण धडकेत विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिद्धेश राजे याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले.
याप्रकरणी टेम्पोचालक प्रतीक मारुती चव्हाण (वय २२, रा. घुलेश्वर, माळशिरस, ता. पुरंदर) याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, टेम्पोचा वेग, नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि वाहनाची स्थिती काय होती, याचा तपास वरिष्ठ निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Labels: Yewalewadi Bopdev Ghat Accident, Pune Road Accident, Trinity College Students Accident, Yewalewadi Police Station, Pune News, Marathi News
Search Description: Three Trinity College students killed and two seriously injured after a speeding Eicher tempo lost control and plowed into students waiting at a bus stop on Yewalewadi-Bopdev Ghat road in Pune; driver detained.
Hashtags: #BopdevGhat #Yewalewadi #PuneAccident #TrinityCollege #PuneNews #RoadSafety #MarathiNews
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२६ ०५:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: