आयुर्वेदिक उत्पादनांच्या आडून अनियंत्रित गुंतवणूक योजनेतून फसवणूक; सीएमडीसह चौघांना अटक, सुमारे ५० लाख रुपयांच्या फसवणुकीची शक्यता आणि ९ हजार आयडी नोंदवल्याचे तपासात उघड!
नवी मुंबई (दि. २० नोव्हेंबर २०२६): आयुर्वेदिक उत्पादनांच्या विक्रीच्या नावाखाली अनियंत्रित व बेकायदेशीर गुंतवणूक योजना चालवून नागरिकांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अर्थवर्धन हेल्थ अँड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीएमडी महादेव काकडे यांच्यासह चौघांना अटक केली आहे. महादेव काकडे याच्यासह प्रदीप शार्दुल, संतोष नाथा आरवेल आणि ओमप्रकाश गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे यांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाकडे प्राप्त झालेल्या गोपनीय तक्रारीच्या आधारे केलेल्या तपासात ही अनियंत्रित योजना बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६४/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८ तसेच बर्ड्स ॲक्ट (BUDS Act) कलम ३५ व २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२६ पासून सुरू असलेल्या या योजनेत आतापर्यंत ९ हजार आयडी नोंदवल्या गेल्याचे आणि साधारण ५० लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची शक्यता तपासात समोर आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिली आहे.
प्राथमिक तपासानुसार, अर्थवर्धन हेल्थ अँड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिचे संचालक महादेव काकडे तसेच सहकारी यांनी ठरलेल्या रकमेचा भरणा केल्यानंतर अत्यंत कमी किमतीची आयुर्वेदिक उत्पादने देण्याची योजना राबवली होती. योजनेत सहभागी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आयडी घेऊन आपल्याखाली इतरांना सामील केल्यास प्रत्येक जोडीमागे ठराविक कमिशन आणि महिन्याला सहा लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते, असे आमिष दाखवले जात होते. तसेच जोडी न जमल्यासही प्रत्येक सदस्यामागे महिन्याला ५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. याशिवाय ठराविक कालावधीत रक्कम जमा केल्यास वाढीव परतावा देण्याचे आश्वासनही गुंतवणूकदारांना दिले जात होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात जमा होणाऱ्या रकमेपैकी केवळ १० टक्के रक्कमच आयुर्वेदिक उत्पादनांवर खर्च केली जात असल्याचे उघड झाले आहे. उर्वरित रकमेतून जुन्या सदस्यांना परतावा देण्यासाठी नवीन सदस्यांकडून जमा होणाऱ्या पैशांचा वापर केला जात होता. या योजनेमध्ये प्रत्यक्ष व्यवसाय निर्मिती किंवा कायदेशीर अर्थनिर्मितीची कोणतीही रचना नसून ती अनियंत्रित व बेकायदेशीर योजना असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जमा होणाऱ्या पैशातूनच कमिशन वाटप केले जात होते; मात्र योजना मोठी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून आरोपी पसार होण्याची शक्यता असते, असे तपासातून स्पष्ट झाले आहे. ही योजना ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाल्याचे समोर आले असून, आतापर्यंत सुमारे ९ हजार आयडी घेतल्या गेल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासात महादेव काकडे हे मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, या कंपनीचे जाळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरले आहे का आणि किती नागरिक यामध्ये अडकले आहेत, याचा अधिक तपास सुरू आहे.
सध्या अटक केलेले आरोपी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून आर्थिक व्यवहारांचे तपशील, बँक खाती आणि नोंदणीकृत सदस्यांची माहिती तपासली जात आहे. गुंतवणूकदारांनी किंवा नागरिकांनी अशा अनियंत्रित व अवास्तव परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी अधिकृत परवानगी व कायदेशीर बाबींची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Labels: Navi Mumbai Crime, EOW Navi Mumbai, Investment Fraud, Ayurvedic Scheme Scam, APMC Police Station, Milind Bharambe, Financial Crime News, Astra News Network
Search Description: Read the news report on Navi Mumbai EOW arresting CMD Mahadev Kakade and three others for running an unregulated investment scheme under the guise of Ayurvedic products with around 9,000 IDs and suspected fraud up to Rs 50 lakh.
Hashtags: #NaviMumbai #CrimeNews #InvestmentFraud #EOW #APMCPolice #FinancialScam #MaharashtraNews #AstraNews
Reviewed by ANN news network
on
११/२०/२०२६ ०७:५३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: