पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांत कार्यरत असणाऱ्या सुमारे ४ हजार ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सण गोड व्हावा यासाठी ३ नोव्हेंबर २०२६ पूर्वी बोनस कायद्यानुसार सन २०२५-२६ चा बोनस आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन तातडीने अदा करावे, या मागणीसाठी आज, गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी महापालिकेवर 'विनम्र अभियान पदयात्रा' काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३:३० वाजता पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा महापालिका मुख्यालयाकडे रवाना होईल. तेथे महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन कामगारांच्या कायदेशीर मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, वाहनचालक, रुग्णालयांमधील स्वच्छता सेवक, वॉर्ड बॉय, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, उद्यान विभाग, अग्निशामक दलातील चालक व जवान, शाळांमधील स्वच्छता सेवक व शिपाई, स्मशानभूमी कर्मचारी तसेच पाणीपुरवठा व जलवाहिनी विभागातील हजारो कामगार शहराची निरंतर सेवा करत आहेत. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 'समान काम समान वेतन' तत्त्व लागू करणे, महापालिकेने कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाचा ५ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा उतरवणे, सेवेत असताना अपघाती अथवा आजारपणामुळे मृत्यू झाल्यास वारसदारास २५ लाख रुपयांची आर्थिक भरपाई देणे आणि अनुकंपा तत्त्वावर वारसदारास महापालिका सेवेत सामावून घेणे, या प्रमुख कायदेशीर मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत.
दरम्यान, या संदर्भात पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात उपकामगार आयुक्त अभय गीते यांच्या उपस्थितीत महापालिकेचे कामगार अधिकारी प्रमोद जगताप यांच्यासोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत उपकामगार आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना तात्काळ बोनस देण्याबाबत संबंधितांना स्पष्ट आदेश काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून अद्याप या आदेशाची ठोस अंमलबजावणी झालेली नाही. अनेक कंत्राटदार मासिक वेतनातच बोनस समाविष्ट असल्याचे भासवून कामगारांच्या कायदेशीर हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.
बोनस कायद्यातील तरतुदींनुसार तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनुसार, कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांना देय रक्कम न दिल्यास मुख्य मालक (प्रिन्सिपल एम्प्लॉयर) म्हणून बोनस आणि वेतन देण्याची थेट कायदेशीर जबाबदारी महापालिका आयुक्तांची ठरते. त्यामुळे प्रशासनाने आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून ३ नोव्हेंबरपूर्वी कामगारांच्या खात्यात बोनस व ऑक्टोबरचे वेतन जमा करावे, अशी आग्रही भूमिका यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.
---
- **Labels:** PCMC News, Contractual Workers, Yashwant Bhosale, Labor Rights, Diwali Bonus, Pimpri Chinchwad, Municipal Corporation, Maharashtra News
- **Search Description:** Contract workers of Pimpri Chinchwad Municipal Corporation to hold a silent protest march for Diwali bonus and pending salary before November 3.
- **Hashtags:** #PCMC #PimpriChinchwad #WorkersRights #DiwaliBonus #LaborNews #YashwantBhosale #Maharashtra #AstraNews
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२६ ०८:०१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: