मुंबई: गर्दीचा फायदा घेऊन बस प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या एका सुसंघटित आंतरराज्यीय टोळीचा मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या मुख्य सूत्रधारासह एकूण सात आरोपींना मानखुर्द, शिवाजीनगर आणि राजस्थान येथून बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून १६ लाख रुपये किमतीचे विविध नामांकित कंपन्यांचे ४२ चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने कंबाला हिल बस स्टॉप ते पेडर रोडदरम्यान बसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन धक्का मारत त्यांचा 'वन प्लस' कंपनीचा महागडा मोबाईल फोन चोरल्याची तक्रार गावदेवी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
तांत्रिक तपास अन् गुप्त बातमीदारांचे जाळे
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास पथकाने बस मार्ग आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान ही चोरी एका वैयक्तिक चोरट्याने केली नसून त्यामागे एक संघटित टोळी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आधी मानखुर्द आणि शिवाजीनगर परिसरात छापे टाकून टोळीतील सदस्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या सुगाव्यावरून थेट राजस्थान गाठून या टोळीच्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या.
अटक आरोपींची नावे
या कारवाईत आफताब आबाद अन्सारी (वय २६), हसन अब्बास शेख (वय ३५), चाँद मोहम्मद मोहम्मद सुलतान (वय ५३), इम्तियाज इमामअली शेख (वय ४६), आझम आक्रम कुरेशी (वय ३२), स्वप्निल शंकर सोनावणे (वय २९) आणि रजब अली मोहमद तकी शेख उर्फ चिकणा (वय ३२) या सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कामगिरी आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) शैलेश बलकवडे, उप आयुक्त (दक्षिण परिमंडळ २) रागसुधा आर., सहाय्यक आयुक्त सुमन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत मोहिते, निरीक्षक (गुन्हे) राजीव पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रताप देसाई, अमित देवकर, उपनिरीक्षक युवराज जगताप, हवालदार रुपेश परब, शैलेश कदम, अभिजित जाधव, प्रमोद पवार आणि शिपाई पुंजाराम गाडेकर, तन्मय सावंत, दीपक करमळकर, जगदेव यांनी पार पाडली.
Labels:
Mumbai Police,Gavdevi Police Station,Mobile Theft Gang,Crime News Mumbai,Mobile Recovery,Rajasthan Cyber CrimeSearch Description:
Gavdevi Police arrest 7 members of an inter-state mobile theft gang from Mumbai and Rajasthan, recovering 42 smartphones worth Rs 16 lakh.Hashtags:
#MumbaiPolice #CrimeNews #MobileThieves #GavdeviPolice #MumbaiCrime #CopsInAction
१६ लाखांचे ४२ चोरीचे मोबाईल जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२६ ०३:१६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: