सुरुवातीला चर्चासत्राची मूळ भूमिका एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे यांनी विशद केली. कोकणात येणारे मोठे उद्योग आणि पर्यटकांचा वाढता ओघ यामुळे येथील पर्यावरणावर होणारे परिणाम आणि विकासाचा समतोल कसा साधावा, यावर त्यांनी प्रकाश टाकला. या संपूर्ण चर्चासत्रात डॉ. केतन चौधरी, सुजय मोरे, संजय मिंगो, डॉ. सुमेधा नाईक आणि व्ही. के. सावंत यांनी विविध सत्रांचे विषय मांडले. तसेच प्राध्यापक प्रवीण बांदेकर, अभिजित हेगशेट्ये, देवदत्त परुळेकर, मल्हार इंदुलकर, डॉ. ज्योती बुवा तोरस्कर, संदीप निंबाळकर, डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. मनीषा गुप्ते, युसुत्सू आर्ते आणि डॉ. मंगलताई देडगे यांच्यासह अनेक नामवंत वक्त्यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपले मोलाचे विचार मांडले. या कार्यक्रमाला नागेश कदम, उपेंद्र टण्णू, राहुल भोसले, शैलेश खांडाळेकर, संजय वराडकर, नितीन वाळके, वेंगुर्ले येथील गटशिक्षणाधिकारी अजय ढाले, पत्रकार महेंद्र पराडकर, नाना मानकर, रमेश अवस्थी, जगदीश नलावडे आणि किशोर शिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मत्स्य साठ्याची होणारी विध्वंसक हानी थांबवण्याची गरज
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात मत्स्य दुष्काळ आणि पारंपरिक मच्छीमारांच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विषय मांडताना डॉ. केतन चौधरी यांनी स्पष्ट केले की, कोकणातील मत्स्य व्यवसाय हा किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेचा कणा असून शाश्वत मासेमारी पद्धती अवलंबणे काळाची गरज आहे. जबाबदारीने मासेमारी करणे प्रत्येक मच्छीमाराचे कर्तव्य आहे. स्फोटकांचा वापर, विषप्रयोग तसेच हानिकारक साधनांचा वापर करून होणारी मासेमारी तातडीने थांबवली पाहिजे. व्यावसायिक मासेमारीसाठी एलईडी दिव्यांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे मत्स्यसाठ्याची विध्वंसक पद्धतीने हानी होत असून नौकांच्या वाढत्या संख्येमुळे मासेमारीवरील ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे भविष्यात मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यावर कठोर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हापूस आंबा आणि कृषी विकासासाठी धोरणात्मक बदल
तिसऱ्या सत्रात आंबा आणि काजू उत्पादनाचे भविष्य वमोरील आव्हाने यावर चर्चा झाली. यामध्ये मार्गदर्शन करताना व्ही. के. सावंत म्हणाले की, कोकणातील हापूस आंब्याची प्रत टिकवून ठेवण्यासाठी त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. हापूसमधील सर्वोत्तम गुणधर्म, टिकवणूक क्षमता (Kipping Quality), आकर्षक रंग आणि बाजारातील मागणीनुसार नवीन वाण विकसित केले पाहिजेत. हापूस आंब्यामध्ये सघन लागवड तंत्रज्ञान (High-Density Planting) आणण्याची आणि हवामान बदलांना तोंड देण्यास सक्षम असणाऱ्या जाती तयार करण्याची आवश्यकता आहे. अतिउष्णतेची आगाऊ सूचना मिळाल्यास शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची व्यवस्था व्हावी. तसेच मोनोकल्चरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी इतर झाडांची २० टक्के लागवड करणे बंधनकारक असावे, अशी शिफारस त्यांनी केली.
निसर्गाचे संरक्षण करणारे शाश्वत पर्यटन
दुसऱ्या सत्रात शाश्वत पर्यटनाच्या संकल्पनेवर मंथन झाले. यामध्ये डॉ. सुमेधा नाईक, मल्हार इंदुलकर आणि प्रसाद गावडे यांनी सहभाग घेतला. सत्र प्रमुख म्हणून बोलताना डॉ. सुमेधा नाईक म्हणाल्या की, पर्यटकांसाठी आनंददायी अनुभव निर्माण करणारे, स्थानकिय युवकांसाठी रोजगार देणारे आणि कोकणच्या निसर्गाचे रक्षण करणारे पर्यटन हीच आपली खरी दिशा असली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे केवळ एक व्यावसायिक पर्यटन स्थळ म्हणून न बघता, एक जिवंत परिसंस्था आणि संस्कृती म्हणून जगासमोर आणले पाहिजे. आपल्याकडे समुद्र, किल्ले आणि समृद्ध लोकसंस्कृती आहे, ती जपण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.
चर्चासत्रात झालेल्या विविध मुद्द्यांच्या आधारे प्राध्यापक प्रवीण बांदेकर, अभिजित हेगशेट्ये व युयुत्सू आर्ते यांनी भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. कार्यक्रमाचा सांगता समारोप बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या भाषनेने झाला. सूत्रसंचालन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सहसचिव उपेंद्र टण्णू यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत खोब्रेकर यांनी मानले.
Labels: Konkan Sustainable Development, Malvan Seminar, Kishore Pawar Birth Centenary, SM Joshi Socialist Foundation, Barrister Nath Pai Sevangan, Fishery and Mango Cultivation, Maharashtra News
Search Description: A one-day seminar on Konkan sustainable development was successfully held in Malvan marking Kishore Pawar birth centenary, addressing fishery crisis, sustainable tourism, and mango production.
Hashtags: #KonkanDevelopment #MalvanSeminar #SustainableTourism #KishorePawar #KonkanNews #Agriculture #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
१०/१९/२०२६ ०३:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: