एमपीएससी आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून कार्यकर्त्यांचेच होते; आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून दोन व्हिडिओ दाखवत पोलखोल
आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, एमपीएससीचे खरेखुरे विद्यार्थी हे राज्यसेवेचा अभ्यास करणारे आणि संविधानाचा आदर करणारे असतात. मात्र, जेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी साधी पाण्याची बाटली, मोबाईल चार्जर, पॉवर बँक किंवा कॉफी मगदेखील कोणी विसरलेले नव्हते. मग असे असताना हे आंदोलक भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाची प्रत आंदोलनस्थळी कशी विसरू शकतात? हा अतिशय गंभीर प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, या संपूर्ण आंदोलनाचे नियोजन रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते करत होते. संविधान हातात घ्यायचे, त्याचा बडेजाव करायचा आणि त्याच संविधानाची पायमल्ली करायची, असा दुटप्पीपणा रोहित पवार आणि त्यांच्या टीमने केल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनाचा हेतू राजकीय लाँचिंगचा?
आंदोलन मागे घेतल्यानंतर केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर त्या व्यासपीठावर उपस्थित राहिलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांनाही प्रश्न पडला की, हे आंदोलन नेमके कशासाठी होते? आपण जी भाषणे केली ती विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होती की रोहित पवारांच्या राजकीय लाँचिंगसाठी आणि त्यांना राज्यस्तरीय नेता बनवण्यासाठी होती, असा सवाल उपस्थित होत असून या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, असे पाचपुते यांनी नमूद केले. ६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, त्यानंतर १० तारखेला दुसरी बैठक पार पडली. या दोन्ही बैठकांमधील निर्णय अमान्य असल्याचे सांगत रोहित पवारांच्या शिष्टमंडळाने ३० तारखेला मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेतली. या बैठकीत न्यायालयीन चौकशीबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने बाहेर येऊन माध्यमांना माहितीही दिली होती. मग असे असताना नेमके काय साध्य झाले, असा सवाल त्यांनी विचारला.
रोहित पवार विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या भावनांचा गैरवापर करत आहेत आणि आयुक्तांचा राजीनामा अशा पद्धतीने सहजासहजी होऊ शकत नाही, हे सत्य जेव्हा आंदोलनात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले, तब ते विद्यार्थी तिथून उठून निघून गेले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रोहित पवार त्या विद्यार्थ्यांना थांबण्याची विनंती करत होते, परंतु विद्यार्थी तिथे थांबले नाहीत, असेही पाचपुते यांनी उघड केले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे आंदोलन थांबवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः यावे आणि त्यानंतर आंदोलन मागे घेतले जावे, असा प्लॅन रोहित पवार यांचा होता. मात्र, रोहित पवार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमवू शकत नाहीत, हे राहुल गांधी यांच्याही लक्षात आले. अखेरीस जे आधी ठरले होते, तेच मान्य झाले. ३० तारखेला ठरलेला मुद्दाच अंमलात आला आणि न्यायालयीन चौकशीही निश्चित झाली. विवेक भीमनवार यांनी स्वतःच्या इच्छेने आणि नैतिकतेच्या आधारावर रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलेले नसतानाही, रोहित पवार यावर चुकीचे कथानक तयार करत आहेत. परवा ते मुख्य सचिवांच्या सहीचा दाखला देत होते, तसा कोणताही अधिकृत आदेश त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तो माध्यमांसमोर आणावा, असे जाहीर आव्हान पाचपुते यांनी दिले.
रोहित पवार हे महाराष्ट्राचे नवे पप्पू
रोहित पवारांना मंत्री, मुख्यमंत्री आणि आमच्याकडूनही अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१७ नुसार अध्यक्षांचा राजीनामा थेट घेण्याची प्रक्रिया राबवता येत नाही. मात्र, ही साधी कायदेशीर प्रक्रिया समजण्यासाठी त्यांना तब्बल १२ दिवस लागले, म्हणूनच आपण त्यांना महाराष्ट्राचे नवीन 'पप्पू' म्हणतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांना गोष्टी उशिरा का होईना समजतात, परंतु त्यांची समजण्याची गती अजूनही जुन्या काळातील 'ट्यूबलाईट'सारखी आहे. आजचा जमाना 'एलईडी'चा असताना ते अजूनही जुन्याच तंत्रज्ञानात वावरत आहेत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
Labels: Vikram Pachpute, Rohit Pawar, MPSC Protest, BJP Maharashtra, Pune News, Political Controversy
Search Description: BJP MLA Vikram Pachpute exposed the MPSC protest, calling it a political drama orchestrated by Rohit Pawar, presenting videos at a press conference in Mumbai.
Hashtags: #VikramPachpute #RohitPawar #MPSCProtest #BJPMaharashtra #PoliticalNews #PuneNews
Reviewed by ANN news network
on
१०/१३/२०२६ ०७:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: