मुंबई: क्रेडिट कार्डची सेवा बंद करण्याचा बहाणा करून नागरिकांची लाखो रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या आणि त्या पैशांतून महागडे मोबाईल फोन खरेदी करणाऱ्या एका सराईत टोळीचा मुंबई पोलिसांच्या एल. टी. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुर्ला (मुंबई) आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून तब्बल १९ लाख ६६ हजार ७५ रुपये किमतीचे एकूण २५ महागडे स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिसबेग समिरबेग मिर्झा (वय २३) आणि मोईन रहिम शेख (वय ३४) अशी आहेत. पोलीस ठाण्यात दाखल तक्रारिनुसार, तक्रारदाराला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. समोरच्या व्यक्तीने आपण आरबीएल क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवले. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डवर सुरू असलेली 'एम. ओ.' (मेल ऑर्डर) सर्व्हिस बंद करायची असल्याचे सांगून आरोपीने त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक बनावट लिंक पाठवली. तक्रारदाराने ती लिंक उघडताच, आरोपींनी त्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय क्रेडिट कार्डवरून तीन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ४,४८,७२१ रुपये परस्पर लांबवले. या रकमेतून आरोपींनी 'रिवगी' (Revg) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून महागड्या वस्तू खरेदी केल्या होत्या.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (क) व ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू केला. सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑनलाईन ट्रांझॅक्शन, आयपी ॲड्रेस आणि मोबाईल कॉल डिटेल्सचे विश्लेषण करून आरोपींचा सुगावा लावला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुंबईतील कुर्ला आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे छापे मारून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्यात खरेदी केलेले ॲपल कंपनीचे २ मोबाईल आणि इतर सायबर गुन्ह्यांमधील ॲपल, सॅमसंग, गुगल, व्हिव्हो अशा नामांकित कंपन्यांचे २३ मोबाईल असे एकूण २५ फोन्स पोलिसांच्या हाती लागले. या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत १९,६६,०७५ रुपये आहे.
ही कारवाई आयुक्त देवेन भारती,सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) शैलेश बलकवडे, उप आयुक्त (दक्षिण परिमंडळ ०२) रागसुधा आर. आणि सहाय्यक आयुक्त (पायधुनी विभाग) रेणूका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात वरिष्ठ निरीक्षक विजय दंडवते, निरीक्षक संजय देशमुख, सायबर पथकाचे उप निरीक्षक दिग्विजय मेटकरी, सतिश बडे, अमोल गोगावले, शिपाई अविनाश पाटील, संतोष कचरे, निलेश झगडे, अमोल जगदाळे तसेच हवालदार प्रफुल्ल पाटील, सागर विचारे आणि जगदेव यांनी मोलाची भूमिका बजावली.
Labels: Cyber Crime, Mumbai Police, Fraud Arrest, Cyber Fraud, LT Marg Police, Ahmedabad News, Crime News
Search Description: LT Marg Police arrest two cyber fraudsters from Ahmedabad for cheating a victim of Rs 4.48 lakh via credit card fraud and recover 25 smartphones worth Rs 19.66 lakh.
Hashtags: #CyberCrime #MumbaiPolice #CyberFraudAlert #CrimeNews #MumbaiCyberCell #FraudArrest
सायबर फसवणुकीच्या पैशातून मोबाईल खरेदी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२६ ०३:३८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: