सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

तुळशीबागेत साकारणार 'गिरीकंधरा'; हवेत तरंगणारे ध्यानस्थ हनुमान


पुणे: पुण्यातील प्रसिद्ध श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग यांच्या वतीने यंदाच्या ६१ व्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त ‘गिरीकंधरा’ हा तब्बल ४० फूट उंच अत्यंत भव्य आणि प्रेक्षणीय देखावा उभारण्यात येत आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात येणारे ११ फुटांचे ध्यानस्थ हनुमानाचे हवेत तरंगणारे रूप ठरणार आहे. पर्वताच्या अंतरंगात प्रवेश केल्यानंतर अनुभवायला मिळणारे अद्भुत विश्व, रामायणकालीन प्रसंग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा मेळ या देखाव्यात साधण्यात आला असून सजावटीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

विश्रामबागवाड्यासमोरून तुळशीबागेत प्रवेश करणाऱ्या गल्लीच्या प्रारंभीच हे मंडळ असून, भाविकांसाठी हा देखावा एक अनोखी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. पर्वताच्या अंतरंगातील 'रामतीर्थ' भाविकांना भक्ती आणि अध्यात्माचा वेगळा अनुभव देईल. धार्मिक कथानकाचा पारंपरिक गाभा कायम ठेवून प्रकाशयोजना, ध्वनी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रभू श्रीराम व गणपती बाप्पा यांचा जयघोष भाविकांना अनुभवता येणार आहे. रामायणातील विविध प्रसंग सादर करताना रामायणकालीन वातावरण आणि सौंदर्य कायम ठेवण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांच्या कल्पकतेतून साकारली कलाकृती

विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते असलेल्या निष्णात कलाकारांनीच या संपूर्ण देखाव्याची रचना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कोरे, ऋषिकेश पोतदार, सिने कलाकार शरद कसबे तसेच प्रसिद्ध मूर्तिकार बिभीषण कातळे यांनी हा संपूर्ण देखावा उभा केला आहे. मंडप व्यवस्था बाळासाहेब गोपळे आणि प्रकाश व्यवस्था सचिन गोडावले यांनी सांभाळली आहे. या कामासाठी दिवेश सोनी, क्षितिज कुंभार, मलेश कांबळे, सिद्धार्थ सातपुते, अरविंद तांदळे, शशिकांत बिडवे, पार्थ तडका, मनोज चिंचकर, दत्तात्रय कावरे, मयूर जाधव, मंगेश चिंचवडकर, रूपेश व्हावळ, ओम झरे, शुभम गोरे, गणेश कदम, गणेश दहीभाते, नरेश माळवे, परमेश्वर पवार, मोहन शिंदे, लालू ठक्कर, सोपान उमाजी, संकेत घुले यांसह मंडळाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

लहानग्यांसाठी 'हनुमान अस्त्र' आणि सामाजिक बांधिलकी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांवर भक्ती, शौर्य आणि उत्तम संस्कार व्हावेत या उद्देशाने १ ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल ५ हजार बालभक्तांना ‘हनुमान अस्त्र’ म्हणून गदा वाटप करण्याचा उपक्रम मंडळाने आखला आहे. उत्सवाच्या भव्यतेसोबतच समाजाला काहीतरी देण्याच्या उद्देशाने मंडळाने पर्यावरण संवर्धनाचाही आदर्श पायंडा पाडला आहे. तुळशीबाग परिसरातील व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या ग्लासातून चहा न पिण्याचे आवाहन करत त्यांना प्रत्यक्षात स्टीलच्या ग्लासांचे वाटप करण्यात आले आहे.

व्यापारी व भाविकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. मंडळाच्या या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाची दखल घेत 'पुणे परिवार' कडून मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांना नुकताच 'आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

  • Labels: Pune Ganeshotsav, Tulshibaug Ganpati, Girikandhara Dekhava, Pune News, Ganeshotsav 2026, Festival News

  • Search Description: Shri Gajanan Mitra Mandal Trust Tulshibaug to present 40 feet high Girikandhara dekhava featuring floating 11 feet Hanuman in Pune Ganeshotsav.

  • Hashtags: #PuneGaneshotsav #Tulshibaug #Girikandhara #GaneshUtsav2026 #PuneNews #GajananMitraMandal

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा