पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ने एका सराईत आरोपीला मुंबईतून शिताफीने जेरबंद केले आहे. फक्रुद्दीन इमामुद्दीन शाह (वय ३९ वर्षे, रा. घाटकोपर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या चौकशीत रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (३) आणि ३०५ (अ) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंद क्रमांक ४२८/२०२६ दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ समांतर तपास करत होते.
सिल्व्हर वॅगनआर गाडी आणि सीसीटीव्ही नेटवर्क
तपासादरम्यान पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे आणि प्रदीपक राठोड यांनी घटनास्थळासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केली. यामध्ये चार संशयित इसम सिल्व्हर रंगाच्या वॅगनआर गाडीतून आले आणि त्यांनी ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर उपनिरीक्षक जालिंदर फडतरे आणि अंमलदार अजित शिंदे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले. तपासात हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने केला असून आरोपी सध्या मुंबईत असल्याची पक्की माहिती मिळाली.
घाटकोपरमधून शिताफीने आवळल्या मुसक्या
वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक जालिंदर फडतरे आणि पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने मुंबईला रवाना करण्यात आले. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:५० वाजता घाटकोपर येथील त्याच्या राहत्या घरातून आरोपी फक्रुद्दीन शाह याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची स्पष्ट कबुली दिली. याशिवाय त्याने आपल्या टोळीसह मिळून रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यातही घरफोड्यांचे अनेक गुन्हे केल्याचे मान्य केले आहे.
तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार
ही धडाकेबाज कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त (गुन्हे ३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती खेडकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
कारवाईत उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, अंमलदार प्रदीप राठोड, रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर आणि साधना पवार यांनी सहभाग घेतला.
Labels:
Pune Police,Crime Branch,Burglary Case,Bharti Vidyapeeth,Mumbai Arrest,Maharashtra CrimeHashtags:
#PunePolice#CrimeBranch#BurglaryArrest#PuneCrime#MumbaiNews#MaharashtraPoliceSearch Description:
Pune Crime Branch Anti-Robbery Cell arrested habitual housebreaking accused Fakruddin Shah from Ghatkopar Mumbai in Bharati Vidyapeeth burglary case.
पुण्यातील घरफोडी प्रकरणाचा मुंबईतून उलगडा; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगार जेरबंद
Reviewed by ANN news network
on
९/०६/२०२६ ०५:५९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: