पुणे (विशेष प्रतिनिधी): पुणे शहरातील चंदननगर व मांजरी परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने खेचून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेने २९ जुलै ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यानच्या दोन गुन्ह्यांचा तपास करत वडगाव शेरी येथून ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून ४ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ४ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ममता सोसायटी, वडगाव शेरी येथे २९ जुलै २०२६ रोजी दुचाकीवरून आलेल्या इसमाने एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने खेचून नेली होती. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४ नुसार गुन्हा (गु.र.नं. ३३३/२०२६) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२६ रोजी मांजरी बुद्रुक येथील बालाजी किराणा दुकानाजवळ अशाच प्रकारे दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेची सोनसाखळी लांबवली होती. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १५५/२०२६) दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ कडील अधिकारी व अंमलदारांनी दोन्ही घटनास्थळांच्या परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले. या तपासाच्या आधारे संशयित आरोपी स्वप्निल सतीश आहेर (वय ३३ वर्ष, रा. भेकराई नगर, पापडे वस्ती, हडपसर, पुणे) यास वडगाव शेरी येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीने चोरी केलेले सोने हडपसर गावठाण येथील एका सराफाला विकल्याचे समोर आल्यावर, मांजरी पोलीस ठाण्याच्या पथकासह संयुक्त कारवाई करत २९ ग्रॅम सोन्याचे दागिने व दुचाकी जप्त करण्यात आली.
ही कारवाई अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक मोहसिन पठाण, उपनिरीक्षक संतोष तानावडे, हवालदार चव्हाण, जोतीबा कुरळे, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, विजय आवाळे, पांडुरंग नानेकर, राहुल इंगळे आणि विक्रांत सासवडकर यांनी केली.
Labels: Pune Crime, Chain Snatch Arrest, Pune Police, Crime Branch Pune, Chandan Nagar Crime, Manjari Crime
Search Description: Pune Police Crime Branch arrests chain snatcher Swapnil Aher, solving two cases in Chandan Nagar and Manjari by examining over 100 CCTV footage clips.
Hashtags: #PunePolice #ChainSnatching #PuneCrime #CrimeBranch #GoldStolen #StreetCrime
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा