सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

पुण्यातील ट्रान्सफॉर्मर चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; ३ जणांना बेड्या, १२ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त


पुणे: पुणे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागामध्ये शेती तसेच महावितरणच्या विजेच्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) मधील तांब्याच्या तारांची चोरी करून हैदोस घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाला यश आले आहे. हवेली तालुक्यातील वाडेगाव परिसरात सापळा रचून टेम्पोसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहित्र चोरीचे तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर आयुक्तालय परिसर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये विजेच्या रोहित्र/ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या तारांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ७ चे पथक परिसरात गस्त घालत असताना अंमलदार विनायक साळवे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वाडेगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे काही संशयित इसम ट्रान्सफॉर्मर चोरी करण्यासाठी मालवाहू वाहनातून येणार आहेत.

मिळालेल्या माहितीची खात्री पटताच पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक राहुल कोळपे व अंमलदारांच्या पथकाने वाडेगाव येथे तातडीने सापळा रचला. संशयित मालवाहू टेम्पो (क्रमांक MH 12 GT 6675) येताच पथकाने पाठलाग करून वाहनाला वेढा घातला आणि त्यातील तीन इसमांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे १) मोहम्मद साहेबजान मंगरेखान (वय ३० वर्षे, रा. गोटेमाळ सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), २) आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२ वर्षे, रा. सासवड) आणि ३) चंद्रसेन शिवरतन धारीया (वय २८ वर्षे, रा. सासवड) अशी सांगितली. हे तिघेही मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असून गेल्या ५ ते ६ महिन्यांत त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस आणि हिंगणगाव या भागातून एकूण ८ ट्रान्सफॉर्मर/रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४(४) आणि भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये दाखल असलेले ८ गुन्हे उघड झाले असून चोरीस गेलेला तांब्याचा साठा व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण १२,७३,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना ६ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक  आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ७ चे निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक राहुल कोळपे, अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उकिर्डे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे, गिरीश नाणेकर, सुहास तांबेकर, किरण पलांडे, नेहा तापकीर, बाळासाहेब तनपुरे, समाधान पाटील, भरत गुंडवाड, प्रतिक्षा पानसरे आणि सोनाली नरवडे यांनी केली आहे.


  • Labels: Pune Crime, Pune Police, Crime Branch Unit 7, Transformer Theft, Lonikand Police, Electricity Theft

  • Search Description: Pune Police Crime Branch Unit 7 busted an interstate gang stealing copper wires from electrical transformers and seized assets worth Rs 12.73 lakh.

  • Hashtags: #PunePolice #CrimeBranch #TransformerTheft #Lonikand #PuneNews #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा