गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 'सर्पदंश व्यवस्थापन' प्रशिक्षण; सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे मार्गदर्शन

 


पुणे, ३ सप्टेंबर २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिटच्या (MSU) वतीने २ सप्टेंबर २०२६ रोजी 'सर्पदंश व्यवस्थापन' या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या जुन्या जी.बी. हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेत १५ हजारहून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवदान देणारे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना जागतिक सर्पदंशतज्ज्ञ आणि राष्ट्रीय सर्पदंश तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. सदानंद राऊत म्हणाले, "सर्पदंश हा टाळता येण्यासारखा गंभीर अपघात असून तातडीने योग्य उपचार मिळाल्यास विषारी सर्पदंश झालेला गंभीर रुग्णही वाचू शकतो." यावेळी त्यांनी 'मिशन झिरो स्नेकबाइट डेथ'ची संकल्पना मांडली. केंद्र व महाराष्ट्र सरकारने सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, भारतात दरवर्षी २० ते ५० लाख सर्पदंशाच्या घटना घडतात आणि ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे:

'Rule of 10' आणि अचूक उपचार: रुग्णाची वैद्यकीय लक्षणे (Clinical Syndrome) अचूक ओळखून उपचारांमध्ये 'अँटी-स्नेक व्हेनम' (ASV) कधी आणि किती प्रमाणात द्यावे, याबद्दल डॉ. राऊत यांनी 'Rule of 10' ची सविस्तर माहिती दिली.

अंधश्रद्धेचे निर्मूलन: सर्पदंशाच्या उपचारात अंधश्रद्धा हा सर्वात मोठा अडसर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचे योग्य प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माहितीपट प्रदर्शन: कार्यशाळेदरम्यान सर्पदंश व्यवस्थापनावर आधारित 'वेनॉम वॉरियर्स' हा माहितीपट दाखवण्यात आला.

या शिक्षण कार्यशाळेमुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्पदंश रुग्णांवर अधिक प्रभावीपणे व वेळेत उपचार करता येतील, असा विश्वास MSU च्या ऑफिसर इनचार्ज तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेस महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि MSU स्टाफ असे एकूण ११८ प्रतिनिधी उपस्थित होते.

Labels: Pune News, PMC, Health News, Snakebite Management, Dr Sadanand Raut, Dr Vaishali Jadhav, Medical Workshop, Pune Health

Search Description: 'Snake bite management' training workshop for medical officers completed by Pune Municipal Corporation. Dr. Sadanand Raut directed 'Mission Zero Snakebite Death' and 'Rule of 10'.

Hashtags: #PuneNews #PMC #HealthDepartment #SnakebiteManagement #MedicalTraining #DrSadanandRaut #PuneHealth #MissionZeroSnakebite


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा