मुंबई (ओशिवरा): फेसबुकवर 'Wizard Traders 7' नावाचे खोटे पेज तयार करून नागरिकांना केवळ ९९ रुपयांच्या गुंतवणुकीवर ९,९९९ रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन मुख्य भामट्यांना ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकाने राजस्थानमधील जयपूर येथून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. दीपक सीताराम मीना (वय २१) आणि हरकेश गोपाळ मीना (वय ३०, दोघे रा. जयपूर, मूळ जि. दौसा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, ओशिवरा परिसरातील एका महिला तक्रारदारा १२ जुलै २०२६ रोजी मोबाईलवर फेसबुक वापरत असताना त्यांना 'Wizard Traders 7' नावाचे एक पेज दिसले. या पेजवर '९९ रुपये भरल्यास ९,९९९ रुपये मिळतील' अशी आकर्षक जाहिरात करण्यात आली होती. तक्रारदारांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. संशयिताने त्यांना योजनेची माहिती देऊन ९९ रुपये क्यूआर कोडवर गुगल पे द्वारे पाठवण्यास सांगितले.
त्यानंतर आरोपींनी १३ जुलै २०२६ च्या पहाटेपर्यंत विविध कारणे सांगून तक्रारदार महिलेला तब्बल २२ ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण ७३,५२१ रुपये वेगवेगळ्या खात्यांवर भरण्यास भाग पाडले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी सतत त्यांचे राहते ठिकाण बदलत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पथकाने तब्बल चार दिवस राजस्थानमधील जयपूर व दौसा जिल्ह्यात माग काढून, दक्षिण जयपूरमधील शिवदासपुरा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींना अंधेरी येथील रेल्वे मोबाईल कोर्टासमोर हजर केले असता त्यांना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून ७० हजार रुपये किमतीचे दोन आयफोन, १० हजार रुपयांचा ओपो मोबाईल, ११ जुने सिमकार्ड, एक एनएसडीएल बँकेचे डेबिट कार्ड आणि पेटीएम क्यूआर स्कॅनर जप्त करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग), उप आयुक्त पुरुषोत्तम कराड (उत्तर परिमंडळ ०१), सहाय्यक आयुक्त विनायक चव्हाण (ओशिवरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, निरीक्षक (सायबर) प्रभात मानकर, निरीक्षक (गुन्हे) सचिन पाटील, उपनिरीक्षक विजय सरदेसाई, सहायक फौजदार अशोक कोंडे, शिपाई विक्रम सरनोबत व सुहास शिंदे यांनी पार पाडली.
Labels: Cyber Crime, Oshiwara Police, Cyber Fraud, Rajasthan Arrest, Facebook Scam, Mumbai Police, IT Act
Search Description: Oshiwara Cyber Police arrested two scammers from Jaipur, Rajasthan for defrauding a woman via a fake Facebook page 'Wizard Traders 7'.
Hashtags: #CyberCrime #MumbaiPolice #CyberFraud #FacebookScam #Jaipur #OshiwaraPolice #CyberSafety
९९ रुपयांत ९९९९ रुपये देण्याचे आमिष दाखवणाऱ्या दोन सायबर ठकांना जयपूरमधून अटक
Reviewed by ANN news network
on
९/०७/२०२६ ०३:४६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: