मुंबई: महाराष्ट्रावर दुष्काळाचे गंभीर सावट असताना विरोधी पक्षांकडून मुंबईत येत्या ४ तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने होणारी कोट्यवधींची उधळपट्टी टाळावी आणि तो निधी मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केले आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. दुष्काळी परिस्थितीत महायुती सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असून सरकारने कर्जमाफीचा तिसरा हप्ताही वितरीत केला असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यात एकीकडे बळीराजा दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे राजकीय स्वार्थासाठी मोर्चे काढले जात आहेत. अशा कठीण प्रसंगात राजकीय नौटंकी करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन बळीराजाला धीर देणे गरजेचे आहे. मात्र, विरोधी पक्ष केवळ राजकीय स्टंटबाजीत व्यस्त असल्याचा आरोप भाजप प्रवक्त्यांनी केला.
"मोर्चा काढल्याचा इतिहास तुमच्या नावावर नोंदवला जाईल"
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले, "राज्यातील शेतकरी संकटात असताना तुम्ही मोर्चा काढला, असा इतिहास तुमच्या नावावर नोंदवला जाईल. त्यामुळे मुंबईत मोर्चा काढून नौटंकी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली तर अधिक बरे होईल. उद्धव ठाकरे यांनी कधीही संवेदनशीलता दाखवली नाही, परंतु राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहे की किमान या दुष्काळाच्या काळात तरी ते प्रचंड खर्च करून मोर्चा काढणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी उबाठा गट आणि मनसेला कधीही माफ करणार नाही व ते कधीही तुम्हाला मतदान करणार नाहीत."
'वर्क फ्रॉम होम'वरून उद्धव ठाकरेंवर प्रहार
इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याच्या वृत्तावर भाष्य करताना बन यांनी जोरदार टोला लगावला. "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही बैठकांना व्हिसीद्वारे उपस्थित असायचे, कारण त्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सवय आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' नांगर आणता येईल का? 'वर्क फ्रॉम होम' पेरणी करता येईल का? अशी संकल्पना ते मांडत होते. म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना घरी बसवत 'वर्क फ्रॉम होम'चे काम बजावले आहे. आताचा मोर्चाही त्यांनी असेच घरी बसून ऑनलाइन पद्धतीने काढावा. तुमचे लाखो समर्थक त्या ऑनलाइन मोर्चात सहभागी होतील आणि किमान त्यातून वाचलेले पैसे तरी आमच्या शेतकऱ्यांना देता येतील," अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
"महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; गरजेनुसार कर्ज काढू"
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आणि शेतकरी मदतीचा उल्लेख करताना बन म्हणाले की, सरकार कर्ज काढेल पण शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहील. कर्ज काढण्यात काहीही चुकीचे नाही, याआधीही विविध सरकारांनी गरजेनुसार कर्जे काढली आहेत. शेतकरी संकटात असताना सरकार हातावर हात धरून बसणार नाही. आवश्यकता असेल तर आणखी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची परंपरा उबाठा गटाची होती, तर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची परंपरा महायुतीची आहे. रोज शंभर कोटी रुपयांची वसुली करणे ही विरोधी पक्षांची परंपरा असू शकते, पण महायुती सरकार केवळ शेतकरी हित जपण्यासाठी कटिबद्ध आहे.
संजय राऊत यांच्या दाव्यावर सवाल
निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन म्हणाले, "तुम्हाला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढायचा असेल तर अजून निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत आहेत ते निवडणूक आयोगाच्या नव्हे, तर सर्वसामान्य देशवासीयांच्या विश्वासावर! ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या संजय राऊत यांना हे माहिती नाही का, की २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्तच नव्हते? आम्ही लोकांची सेवा करतो, थेट जनतेत जातो आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करतो, म्हणूनच लोक आम्हाला निवडून देतात," असा टोला त्यांनी लगावला.
Labels:
BJP Maharashtra,Navnath Ban,Uddhav Thackeray,Raj Thackeray,Maharashtra Farmers,Drought Relief,Maharashtra PoliticsSearch Description:
BJP spokesperson Navnath Ban asks Uddhav and Raj Thackeray to cancel their protest march and use the funds to help drought-affected farmers in Maharashtra.Hashtags:
#MaharashtraPolitics #BJP #NavnathBan #UddhavThackeray #RajThackeray #FarmerRelief #DroughtInMaharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: