आमदार शंकर जगताप यांच्याकडून रावेत, किवळे आणि मामुर्डीकरांच्या समस्यांचे "फास्ट ट्रॅक" निराकरण
पिंपरी, ३ सप्टेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित ‘आमदार आपल्या दारी’ या जनसंवाद उपक्रमाला रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रावेत येथील समीर लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार जगताप यांनी ७१५ नागरिकांच्या तक्रारी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बहुतांश प्रश्नांवर जागीच तोडगा काढला.
या उपक्रमाला महापालिका, महसूल, पोलीस आणि महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, तहसीलदार जयराज देशमुख, उपायुक्त राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, 'ज’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, मनपा कार्यकारी अभियंता सुनील पवार, महावितरणचे सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लिंभोरे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जनसंवादात नागरिकांनी पाणीपुरवठा, बीआरटी व अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, वीजपुरवठा, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, रेशनकार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित समस्या मांडल्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व सूचना:
अतिक्रमण व वाहतूक कोंडी: फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून देणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत आठवडे बाजार आणि रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या जड वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
नागरी सुविधा व पायाभूत सुविधा: किवळे येथे ज्येष्ठांसाठी उद्यान विकसित करणे, विकास नगर येथे विरंगुळा व सांस्कृतिक केंद्र उभारणे, सेवा रस्त्यांचे डांबरीकरण, डीपी रस्ते विकसित करणे आणि स्ट्रीट लाईट सुरू करण्याबाबत निर्देश दिले गेले.
आरोग्य व स्वच्छता: भटका कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, नियमित घंटागाडी पाठवणे आणि कचरा संकलन केंद्रांचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
एकाच छताखाली महापालिका, तहसील, रेशनिंग, एमएसईबी, एमएनजीएल आणि एनएचएआय (NHAI) या सर्व प्रमुख विभागांचे दालन उभारण्यात आल्याने नागरिकांना विविध कार्यालयांचे फेरे न मारता एकाच ठिकाणी प्रशासनाशी संवाद साधता आला. तांत्रिक प्रक्रिया आवश्यक असलेल्या प्रकरणांचा कालबद्ध पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी दिले.
Labels: Pimpri Chinchwad News, Shankar Jagtap, Ravet News, Kiwale News, PCMC, Chinchwad Assembly, MLA Aaplya Dari, Civics News
Search Description: Chinchwad MLA Shankar Jagtap's 'Aamdar Apya Dari' initiative took immediate action on 715 civil problems in Rawet, Kiwale and Mamurdi. Special emphasis on encroachment, traffic and road development.
Hashtags: #ShankarJagtap #Chinchwad #Ravet #PCMC #MLAAaplyaDari #PimpriChinchwad #RavetNews #CivicIssues
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा