'डीजे'मुक्त उत्सवाचे समर्थन, पण हिंदू संस्कृतीवरील आघात खपवून घेणार नाही;हिंदू जनजागृती समितीचा प्रहार
पुणे: गणेशोत्सवातील 'डीजे' आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा विषय सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये 'डीजे' किंवा कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश ध्वनिवर्धक वापरू नयेत, याविषयी हिंदू जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने प्रबोधन करत आहे. उत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी समितीची व्यापक मोहीम सुरूच आहे. मात्र, 'डीजे' आणि ध्वनिप्रदूषणाच्या सूत्राचा आघात करत हिंदू धर्म, संस्कृती आणि सण-उत्सवांवर होणारी विनाकारण टीका अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नरेंद्र दाभोळकर यांनी काही वर्षांपूर्वी 'गणेशमूर्तींच्या विसर्जनाने जलप्रदूषण होते' असा प्रचार करत एक विशिष्ट नॅरेटिव्ह सेट केले होते. वर्षातील ३६५ दिवस नद्या प्रदूषित करणाऱ्या गंभीर आणि औद्योगिक घटकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवातील १० दिवसांतच प्रदूषण होते, असा आव आणत कृत्रिम हौदांची संकल्पना पुढे आणली गेली. आता त्याच धर्तीवर ध्वनिप्रदूषणाची नवी टूम बाजारात आणली जात आहे.
वर्षभर होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत पुरोगामी गप्प का?
गणेशोत्सवातील 'डीजे'मुळे होणारे ध्वनिप्रदूषण नक्कीच रोखले गेले पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु, वर्षभर इतर कारणांमुळे होणाऱ्या तीव्र ध्वनिप्रदूषणाचा विचार आपण करणार आहोत की नाही, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. विद्यानंद बापट आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरोगामी मंडळींनी ज्याप्रमाणे गणेशोत्सवातील डीजेवर बंदीची मागणी केली आहे, त्याच हिमतीने त्यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवणे, थर्टी फर्स्टच्या रात्री चालणारे पार्ट्यांचे उंगळवाणे कार्यक्रम आणि 'सनबर्न'सारखे अवाढव्य म्युझिक इव्हेंट्स थांबवण्याची मागणी करावी, असे थेट आव्हान सुनील घनवट यांनी दिले आहे.
केवळ हिंदू सण-उत्सवांना लक्ष्य करायचे आणि त्या बहाण्याने हिंदू धर्मातील 'द्वैत-अद्वैत तत्त्वज्ञाना'ला 'बौद्धिक हस्तमैथुन' म्हणणे किंवा सार्वजनिक उत्सवांना 'लष्करे-उत्सव' म्हणून हिणवणे, हा केवळ ध्वनिप्रदूषणाचा विषय नसून त्याआडून हिंदू धर्मावर केलेला आघात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून हिंदू संस्कृतीला बदनाम करणाऱ्या या तथाकथित पुरोगामी मानसिकतेचा हिंदू जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करा; पण दुटप्पीपणा नको
भारतात संविधानाचे आणि कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनुसार प्रशासनाने अवश्य आणि कठोर कारवाई करावी. परंतु, त्याच वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्म आणि श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणाऱ्या विकृत प्रवृत्तींवरही कायद्यानुसार तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम मागणी समितीकडून करण्यात आली आहे.
हिंदू जनजागृती समिती ही केवळ डीजेला विरोध करण्यापुरती मर्यादित नसून उत्सवाचे धार्मिक पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. गणेशोत्सव मंडपांमध्ये जुगार खेळणे, दारू पिणे, मद्याच्या नशेत अश्लील नृत्य करणे, श्री गणेश मूर्तीसमोर कर्णकर्कश व अश्लील गाणी वाजवणे, मंडपासमोर धुम्रपान करणे आणि नागरिकांकडून सक्तीने वर्गणी वसुली करणे यांसारख्या अनिष्ट प्रथांविरोधात समिती गेल्या दोन दशकांपासून लढा देत आहे.
सण-उत्सव हे राष्ट्रभक्ती आणि समाजप्रबोधनाचे माध्यम
सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून तो धर्माचरण, संस्कृतीचे संवर्धन, राष्ट्रभक्ती, समाजप्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्वांनी उत्सवाचे सात्त्विक रूप जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत सुनील घनवट यांनी व्यक्त केले आहे.
Labels: Hindu Janajagruti Samiti, Ganeshotsaw 2026, DJ Ban, Sunil Ghanwat, Noise Pollution Law, Pune News, Festival Rules
Search Description: Hindu Janajagruti Samiti supports DJ-free Ganeshotsav but strongly opposes attacks on Hindu culture under the guise of noise pollution discussions.
Hashtags: #HinduJanajagrutiSamiti #Ganeshotsav #DJBan #SunilGhanwat #PuneNews #FestivalRules #NoisePollution
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: