विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणाचा प्रयत्न; भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा विरोधकांवर घणाघात
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून आणि नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आंदोलनांवर आणि टिकेवर भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटना घडल्या, तेव्हा रोहित पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार मूग गिळून गप्प बसले होते. आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नाही, तर स्वतःचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी रोहित पवार आणि काँग्रेस विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत," असा थेट आणि घणाघाती आरोप नवनाथ बन यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी विरोधकांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. "रोहित पवार यांचे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम हे निव्वळ पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी किंवा करिअरशी काहीही देणेघेणे नाही. जर त्यांना खरोखरच विद्यार्थ्यांचे हित महत्त्वाचे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थांमध्ये किती गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले, याची आकडेवारी जाहीर करावी," असे थेट आव्हान त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट करताना बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांचे सर्व प्रश्न व मागण्या ऐकून घेतल्या आहेत. एवढेच नाही तर सारथी आणि बार्टी यांसारख्या विविध शासकीय संस्थांच्या आणि योजनांच्या माध्यमातून एमपीएससी व यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक सवलती व सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. भूतकाळात काँग्रेसच्या सत्ताकाळात कशा प्रकारे परीक्षांचे आयोजन केले जात होते, कोणत्या प्रकारे गैरप्रकार चालत असत आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले जात होते, हे राज्यातील विद्यार्थ्यांनी जवळून पाहिले आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
एमपीएससीच्या स्वायत्ततेवर प्रकाश टाकताना मुख्य प्रवक्त्यांनी सांगितले की, एमपीएससी ही एक पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे आणि तिचे अध्यक्ष व संपूर्ण समिती स्वतंत्रपणे काम करते. या कारभारात काही चुकीचे घडल्यास किंवा अनियमितता आढळल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) भरतीचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अत्यंत जलद तपास करत परीक्षा नियंत्रकापासून (एग्झाम कंट्रोलर) एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही आणि कडक शिक्षा केली जाईल. मात्र, या संवेदनशील विषयाचे भांडवल करून राजकीय नाटकीपणा करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, जो अतिशय चुकीचा आणि निषेधार्ह आहे.
हिंदू सण आणि डीजेच्या वादावरून संजय राऊत यांच्यावर टीका
ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वापरावर बोलताना बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. "मोठमोठ्या आवाजात डीजे लावण्याचे समर्थन कोणीही केलेले नाही. परंतु, संजय राऊत यांना आमचा थेट सवाल आहे की, जेव्हा इतर धार्मिक मिरवणुका किंवा जुलूस निघतात आणि रात्री उशिरापर्यंत सायलेन्सर काढलेल्या गाड्यांचे मोठे आवाज मुंबईच्या रस्त्यांवर होतात, तेव्हा संजय राऊत तोंडाला पट्टी लावून गप्प का बसतात? तेव्हा त्यांना कोणत्याही आवाजाचा किंवा प्रदूषणाचा त्रास होत नाही का? लालबाग परिसरात गणपती मिरवणुकीदरम्यान घडलेल्या घटनांवरही ते मूग गिळून गप्प बसतात. त्यांना केवळ हिंदू धर्माच्या सणांबद्दल आक्षेप आहे आणि त्यांचा हा दुटप्पी चेहरा आम्ही जनतेसमोर आणत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना बन म्हणाले की, "राज्यात शेतकरी अडचणीत असताना आणि सरकार त्यांच्या मदतीसाठी विविध योजना राबवत असताना विरोधकांकडून राजकीय आरोप केले जात आहेत. एकरभर वांग्याच्या शेतीतून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे दावे करणाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो फॉर्म्युला दिला तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना विविध कृषी सवलती आणि आर्थिक मदत पुरवली जात आहे. भाजप असा कोणताही चुकीचा व्यवहार करत नाही," असा घणाघात त्यांनी शेवटी केला.
Labels: Navnath Ban, BJP Maharashtra, MPSC News, Rohit Pawar, Supriya Sule, Sanjay Raut, Maharashtra Politics, Paper Leak News
Search Description: BJP Chief Spokesperson Navnath Ban attacks opposition leaders Rohit Pawar, Supriya Sule, and Sanjay Raut over MPSC exam issue, paper leak arrests, and political drama.
Hashtags: #BJPMaharashtra #MPSC #NavnathBan #RohitPawar #SupriyaSule #SanjayRaut #MaharashtraPolitics #PaperLeak #MPSCNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: