सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

पुणे महापालिकेत 'सिटीझन्स ओपन डे' प्रभावीपणे राबवण्याची आम आदमी पार्टीची मागणी

 


सुदर्शन जगदाळे यांचा प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्ला

पुणे: पुणे महानगरपालिकेतील नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद वाढवण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत निश्चित केलेला 'सिटीझन्स ओपन डे' (Citizen Open Day) प्रभावीपणे राबवण्यात यावा, अशी जोरदार मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या ठरलेल्या वेळेत सर्व संबंधित खातेप्रमुख आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात नागरिकांसाठी सक्तीने उपलब्ध राहावे, या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी भाजपच्या सत्ताकाळातील कारभारावर कडक शब्दांत टीका केली.

पुणे महानगरपालिकेने यापूर्वी जारी केलेल्या कार्यालयीन परिपत्रकानुसार नागरिकांना दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या कालावधीत महापालिकेतील अभिलेख व दस्तऐवज पाहणीसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. याशिवाय महाराष्ट्र शासनाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे नागरिकांना कार्यालयीन दस्तऐवजांची पाहणी करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला व्यापक स्वरूप दिले होते.

भाजपच्या काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा

या पार्श्वभूमीवर बोलताना आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात नागरिकांना प्रशासनापासून दूर ठेवण्याची आणि त्यांच्या मूलभूत प्रशासकीय हक्कांवर गदा आणण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या महापालिकेत करदात्या नागरिकांनाच अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर हे लोकशाही आणि उत्तरदायी प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांना पूर्णपणे छेद देणारे आहे.

प्रत्यक्षात अनेक वेळा सोमवारी दुपारी ३ ते ५ या नागरिकांसाठी राखीव ठेवलेल्या वेळेत खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी अथवा संबंधित कर्मचारी बैठका, दौरे किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट न घेताच रिकाम्या हाताने परत जावे लागते. परिणामी 'ओपन डे' ही संकल्पना केवळ कागदावरच उरली असून ती प्रत्यक्षात नागरिकांसाठी खुली झाली पाहिजे, असा थेट सवाल जगदाळे यांनी केला.

आम आदमी पार्टीच्या प्रमुख १० मागण्या

आम आदमी पार्टीने महापालिका आयुक्तांकडे खालील प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत:

१. दर सोमवारी दुपारी ३ ते ५ हा 'सिटीझन्स ओपन डे' कोणत्याही परिस्थितीत प्रभावीपणे व नियमितपणे सुरू ठेवावा.

२. या वेळेत सर्व संबंधित खातेप्रमुख व जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या दालनात उपस्थित राहणे बंधनकारक करावे.

३. 'ओपन डे'च्या वेळेत नागरिकांच्या भेटीला सर्वोच्च प्राधान्य देऊन या कालावधीत नियमित बैठकांचे आयोजन टाळावे.

४. अत्यावश्यक शासकीय कामामुळे अधिकारी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्या जागी सक्षम पर्यायी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.

५. प्रत्येक विभागाच्या कार्यालयाबाहेर “Citizen Open Day – Monday, 3 PM to 5 PM” असे फलक ठळकपणे लावावेत.

६. संबंधित अधिकारी, त्यांचे पदनाम आणि विभागाची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.

७. अधिकारी उपस्थितीची हजेरी पुस्तक (Visitor Register) किंवा डिजिटल नोंदणी व्यवस्था तातडीने सुरू करावी.

८. नागरिकांना अभिलेख पाहणी, संवाद आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर निश्चित करावी.

९. 'ओपन डे'चे नियम पाळले जात आहेत की नाही, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी व तपासणी व्हावी.

१०. जाणूनबुजून आदेशांचे उल्लंघन करून नागरिकांना ताटकळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाची गरज

"पुणेकर नागरिक नियमित कर भरतात आणि त्याच करातून महापालिकेचा सर्व कारभार चालतो. त्यामुळे नागरिकांना भेटण्यासाठी प्रशासनाने ठरवलेली वेळ ही केवळ औपचारिक कागदी घोडा राहता कामा नये. जर नागरिकांना अधिकारी भेटणारच नसतील, तर या उपक्रमाचा मूळ उद्देशच संपुष्टात येतो," असे सुदर्शन जगदाळे यांनी स्पष्ट केले.

याविषयी आपचे दुसरे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी सांगितले की, भाजपच्या सत्तेच्या काळात नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून प्रशासन नागरिकांपासून दूर ठेवण्याची जी पद्धत निर्माण झाली होती, ती आता बदलण्याची वेळ आली आहे. पुणेकरांना त्यांच्या हक्काची माहिती, अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि पारदर्शक प्रशासन मिळालेच पाहिजे. ही मागणी कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून संपूर्ण पुणेकरांना उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख प्रशासन मिळावे यासाठी आहे.

याप्रसंगी महापालिका आयुक्तांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन स्पष्ट आदेश काढावेत, 'सिटीझन्स OPEN DAY'ची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी आणि त्या आदेशाची प्रत सार्वजनिक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी आम आदमी पार्टीचे सरचिटणीस सुभाष कारंडे, युवा उपाध्यक्ष मिलिंद ओव्हाळ, उपाध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष कुमार धोंगडे, अरुण केदारी, शिक्षक आघाडी अध्यक्षा शितल कांडेलकर, सुनिता काळे, माधुरी गायकवाड, अविनाश भाकरे, संजय रणधीर, अक्षय वायदंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • Labels: Pune News, Citizen Open Day, AAP Pune, Sudarshan Jagdale, PMC Administration, Pune Municipal Corporation, Naval Kishore Ram

  • Search Description: Aam Aadmi Party Pune demands effective implementation of Citizen Open Day at PMC every Monday from 3 PM to 5 PM, criticizing past BJP governance.

  • Hashtags: #PuneNews #AAMPune #PMC #SudarshanJagdale #CitizenOpenDay #PuneMunicipalCorporation #PublicService


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा