पिंपरी: डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या तीव्र ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने शहरनिहाय वेगवेगळी आणि दुटप्पी भूमिका घेण्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच स्पष्ट, राज्यव्यापी धोरण निश्चित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या (आप) युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे. मुंबईत कारवाई, नागपुरात निर्बंध आणि पुण्यात वेगळी सवलत असे वेगवेगळे नियम का लावले जात आहेत, असा सवाल करत राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेऊन त्याची संपूर्ण महाराष्ट्रात एकसमान अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुण्यातील ज्येष्ठ नागरिक विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर पुण्यात नागरिकांनी काढलेला भव्य मोर्चा या पार्श्वभूमीवर काळे यांनी पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार निशाणा साधला.
नागपूर आणि मुंबईत कडक कारवाई, मग पुण्यासाठी वेगळे निकष का?
नागपुरात पोलीस आयुक्तांनी डीजे आणि लेझरच्या वापरावर स्पष्ट निर्बंध आणले आहेत, तर मुंबईतही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मग पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी वेगळे निकष का ठेवले जात आहेत, असा प्रश्न रविराज काळे यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, "डीजेमुळे निर्माण होणारा प्रचंड आवाज आणि लेझरचा लखलखाट थेट नागरिकांच्या आरोग्यावर, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि हृदयविकाराच्या रुग्णांवर गंभीर परिणाम करत आहे. हा प्रश्न राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एका दिवसात सोडवू शकतात. राजकीय हेतूने प्रेरित अनेक निर्णय काही तासांत घेणारे सरकार नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यास एवढा वेळ का लावत आहे?"
विद्यानंद बापट यांच्या समर्थनात बालगंधर्व ते महापालिकेवर भव्य मोर्चा
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजे आणि तीव्र आवाजाविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. या हल्ल्यानंतर पुण्यातील सजग नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिका भवनापर्यंत नागरिकांनी भव्य मोर्चा काढून ध्वनीप्रदूषणाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला.
या मोर्चाला आणि बापट यांच्या भूमिकेला पुणेकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचे सांगत काळे म्हणाले, "पुणे हे सामाजिक सुधारणा आणि वैचारिक चळवळींची उज्ज्वल परंपरा असलेले शहर आहे. अशा संस्कृत शहरात एखाद्या नागरिकाने ध्वनीप्रदूषणाचा रास्त प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याची हेटाळणी करणे किंवा त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणे हे लोकशाहीला कलंक लावणारे आहे."
सर्वपक्षीय बैठक बोलावून स्पष्ट धोरण ठरवण्याची मागणी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यरत असतात. त्यामुळे या विषयाला राजकीय वळण प्राप्त झाले आहे. हा मुद्दा केवळ सामाजिक किंवा पर्यावरणीय राहिला नसून राजकीय बनला असल्याने राज्य सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. या बैठकीत सर्व पक्षांशी चर्चा करून डीजे आणि लेझरबाबत एकमुखी आणि स्पष्ट धोरण निश्चित केले पाहिजे, अशी ठाम मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
"सरकारकडे निर्णयक्षमता आणि ठोस राजकीय इच्छाशक्ती असेल तर डीजे हवा की नको, याचा निकाल एका बैठकीत लागू शकतो. 'लोकसंवादाच्या' नावाखाली निर्णय पुढे ढकलण्यापेक्षा सरकारने जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन संपूर्ण राज्यात एकसमान कायद्याची अंमलबजावणी करावी," असा इशाराही रविराज काळे यांनी दिला.
Labels:
Noise Pollution,DJ Restrictions,Raviraj Kale,AAP Maharashtra,Pune News,Pimpri Chinchwad,Maharashtra PoliticsHashtags:
#NoisePollution#DJRestrictions#AAPMaharashtra#RavirajKale#PuneNews#MaharashtraNews#PimpriNewsSearch Description:
AAP Youth Wing State President Raviraj Kale demands a uniform statewide policy on DJ and noise pollution across Maharashtra, questioning different rules for Pune, Mumbai, and Nagpur.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: