शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

पुण्यात २५ लाखांचे एमडी ड्रग्ज अन् शस्त्रांचा साठा जप्त; मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई


पुणे (विशेष प्रतिनिधी): पुणे शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी मोठी कारवाई केली. आनंदनगर वसाहतीमधील सार्वजनिक शौचालयाजवळील गल्लीत सुरू असलेल्या बेकायदेशीर ड्रग्ज विक्रीच्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा १२५ ग्रॅम 'मेफेड्रॉन' (एमडी) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत ड्रग्जसह अवैध दारू, तलवार, कुऱ्हाड आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण २५ लाख १८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ओम कुंडलीक गायकवाड (वय २५, रा. आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड) याला अटक करण्यात आली आहे.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे अंमलदार महेबूब नदाफ यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, आनंदनगर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाजवळील गल्लीत ओम गायकवाड व त्याचा भाऊ राहत्या घरामध्ये अवैध दारू तसेच मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले, उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे व पथकाने गुरुवारी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात २५ लाख रुपयांचे १२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, १०,४०० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, एक तलवार, एक कुऱ्हाड, लोखंडी पाईप, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात ओम गायकवाड आणि त्याच्या भावाविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायदा, आर्म ॲक्ट, भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ओम गायकवाड यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उपायुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते,  सहाय्यक आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत जगताप, निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले, उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, सुनील भापकर, अंमलदार दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, गोरखनाथ चिनके, राजेश थोरात, महेबूब नदाफ, महेश जेधे, नितेश जाधव, सिमा शेंडकर, हर्षा चांदगुडे, बालाजी शिंदे, संदीप सुर्यवंशी, पुजा कदम आणि आसावरी धायगुडे यांनी पार पाडली.


  • Labels: Pune Police, Market Yard Police Station, Mephedrone Seized, MD Drug Bust Pune, Crime News Pune, Pune Crime Branch

  • Search Description: Market Yard Police seized Mephedrone MD drug worth 25 Lakhs, illegal liquor, and weapons in Anandnagar Colony Pune, arresting Om Gaikwad.

  • Hashtags: #PunePolice #DrugBust #CrimeNews #MarketYard #MephedroneSeized #PuneCrime #LawAndOrder

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा