३ लाखांची सुपारी देऊन सुनेचा काटा काढला; सासूनेच रचला कट!


मुंबई: मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर परिसरात एका महिलेचा तिच्या सासूनेच सुपारी देऊन खून घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव रचणाऱ्या सासूनेच आपल्या माजी मोलकरणीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला ३ लाख रुपयांची सुपारी देऊन सुनेची निघृण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार पंतनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेची सासू, माजी मोलकरीण, तिचा पती, मुलगा आणि मुलगी अशा एकूण पाच आरोपींना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सपना प्रमोद गंजी (वय ३५ वर्षे, रा. त्रिवेणी बिल्डींग, डी विंग, रूम नं. २०४, लक्ष्मीनगर, घाटकोपर, मुंबई) असे मयत महिलेचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सासू धनलक्ष्मी भिक्षापती गंजी (वय ६० वर्षे), माजी मोलकरीण मंगलाबाई सुरेश जाधव (वय ४५ वर्षे), तिचा पती सुरेश गणपत जाधव (वय ४६ वर्षे), मुलगा साजन सुरेश जाधव (वय १९ वर्षे) आणि मुलगी शिवानी सुरेश जाधव (वय २१ वर्षे) यांना अटक केली आहे.
 
हॉस्पिटलमधील बनाव अन् पोलिसांचा संशय

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातून १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १:०० वाजताच्या सुमारास पंतनगर पोलीस ठाण्याला एक संदेश प्राप्त झाला. सपना गंजी ही महिला १६ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तिच्या घरी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने तिला तिची सासू धनलक्ष्मी गंजी हिने प्रथम उपचारासाठी सुप्रीम हॉस्पिटल येथे नेले आणि त्यानंतर राजावाडी हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी रात्रौ १२:४१ वाजता तिला मृत घोषित केले, असा तो संदेश होता.

संदेश मिळताच पंतनगर पोलिसांचे पथक तात्काळ राजावाडी रुग्णालयात पोहोचले. पोलीस पथकाने मृतदेहाची पाहणी केली असता, सपना गंजी यांच्या गळ्याभोवती काळे-निळे डाग दिसत होते आणि डोक्याच्या डाव्या बाजूस रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तेथे उपस्थित असलेल्या सासू धनलक्ष्मी हिच्याकडे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता, तिने मयत महिलेसोबत भांडण झाल्याने तिला ढकलून दिल्याने ती बाथरूममध्ये पडून डोक्याला लागून मयत झाल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
 
जुना राग, नालासोपारा पोलीस ठाण्यातील केस अन् हत्येचा कट

मयत सपना गंजी हिचे वडील राजेंद्र नरसया वल्लाळ (वय ६३ वर्षे) यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात कलम १०३(१), ११५(२), ३५२ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवून सासू धनलक्ष्मी हिला तात्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीदरम्यान सासू धनलक्ष्मी हिची कसून चौकशी केली असता, हत्येमागील धक्कादायक कारणे समोर आली. सासूने दिलेल्या माहितीनुसार, मयत सपना हिला दारूचे व्यसन होते. याव्यतिरिक्त सपना हिने सासरच्या लोकांविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात सन २०२४ मध्ये कलम ४९८ (अ), ३७७, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंदवला होता, तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार (Domestic Violence Act) तक्रार दाखल केली होती. या सर्व कायदेशीर बाबींचा आणि वादाचा प्रचंड राग सासू धनलक्ष्मीच्या मनात होता.

सपना ही जून २०२६ मध्ये दुबईहून सुट्टीकरिता तिच्या मुलासोबत मुंबईत आली होती. ती मुंबईत आल्याचे समजताच सासू धनलक्ष्मी हिने साधारणतः एका महिन्यापूर्वी तिची पूर्वीची मोलकरीण मंगला जाधव हिला गाठले. मंगला जाधव, तिचा पती, मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत मिळून सपनाचा डोळ्यात मिर्ची पूड टाकून व गळा आवळून खून करण्याचा कट रचण्यात आला. या कामासाठी मोलकरीण आणि तिच्या कुटुंबाला ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
 
डोळ्यात मिर्ची पूड, ओढणीने गळा आवळला अन् मानेवर पाय देऊन निर्दयपणे हत्या

घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आणि आरोपींच्या चौकशीतून हत्येच्या दिवशी घडलेला भयानक थरार समोर आला. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:४५ वाजताच्या सुमारास मयत सपना गंजी ही घरामध्ये एकटीच होती. सासूच्या सूचनेनुसार मोलकरीण मंगला जाधव, तिची मुलगी शिवानी, पती सुरेश आणि मुलगा साजन या चौघांनी एकापाठोपाठ एक घरात प्रवेश केला.

सपना ही दारूच्या नशेत असताना आरोपींनी तिच्या डोक्यात काचेचा ग्लास मारला आणि डोळ्यात मिर्ची पूड टाकली. त्यानंतर तिच्याच ओढणीने गळा आवळला. तरीदेखील ती जिवंत असल्याचे पाहून आरोपी सुरेश जाधव आणि त्याचा मुलगा साजन जाधव यांनी सपनाच्या गळ्यावर आणि छातीवर पाय देऊन उभे राहून तिचा जीव घेतला. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढला.
 
पाचही आरोपी गजाआड; पोलिसांची धडक कारवाई

पंतनगर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत हत्येचा हा क्लिष्ट कट उघडकीस आणत १८ ऑगस्ट २०२६ रोजी उर्वरित चारही आरोपी (मंगलाबाई जाधव, सुरेश जाधव, शिवानी जाधव आणि साजन जाधव) यांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने सर्व आरोपींना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर  आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) धनंजय कुलकर्णी,  उपआयुक्त (पूर्व परिमंडळ ६) गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक लता सुतार, निरीक्षक परशुराम लोंढे, अजित गोंधळी, राजेश चंदुगडे, अस्लम खतीब, सहाय्यक निरीक्षक उमेश शिंदे, दगडू जाधव, प्रशांत कुंभार, उपनिरीक्षक गोडबोले, महिला उपनिरीक्षक चट, उपनिरीक्षक काटकर, गुमलाडू, सहाय्यक फौजदार रमेश पवार, हवालदार भाऊसाहेब घुगे, अविनाश इंगळे, अंमलदार दत्तू पवार, नारायण दळवी आणि रवि चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

  • Labels: Pant Nagar Police Station, Ghatkopar Crime News, Mumbai Crime, Ghatkopar Murder Case, Sapna Ganji Murder, Mumbai Police, Crime News Maharashtra

  • Search Description: Pant Nagar Police arrest 5 people including mother in law Dhanalaxmi Ganji and maid family for plotting murder of Sapna Ganji in Ghatkopar Mumbai.

  • Hashtags: #GhatkoparMurder #PantNagarPolice #MumbaiCrime #CrimeNews #MumbaiPolice #Ghatkopar #LawAndOrder


३ लाखांची सुपारी देऊन सुनेचा काटा काढला; सासूनेच रचला कट!  ३ लाखांची सुपारी देऊन सुनेचा काटा काढला; सासूनेच रचला कट! Reviewed by ANN news network on ८/२०/२०२६ १२:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".