नवी मुंबईत पी. के. डेअरीतील दूधभेसळ रॅकेटचा पर्दाफाश, ४,७१० लिटर दुधासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
ठाणे/नवी मुंबई: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या आणि संघटित दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गोपनीय पद्धतीने पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व आदेशानुसार, तसेच दक्षता विभागाच्या सह-आयुक्त प्रीती टिपरे आणि ठाण्याचे अन्न सह-आयुक्त सचिन जाधव यांच्या थेट सूचनेनुसार ही मोठी धडक कारवाई पार पडली. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या पक्का गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या विशेष पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक धाड टाकून या रॅकेटचा भांडाफोड केला.
भेसळीची धक्कादायक पद्धत अन् रंगेहाथ पकडलेला आरोपी
एफडीएच्या पथकाने केलेल्या या कारवाईदरम्यान मे. पी. के. डेअरीच्या आवारात 'एमएच ०४ केयू १६३४' या क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे दिसून आले. डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या थेट संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची सीलबंद पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि चिलर मधील थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतत असताना पथकाने त्याला जागेवरच रंगेहाथ पकडले.
प्रशासनाने केलेल्या प्राथमिक तपासात भेसळीची अत्यंत धक्कादायक पद्धत समोर आली आहे. आरोपी १ किलो स्किम मिल्क पावडरमध्ये तब्बल ८ ते १० लिटर थंड पाणी मिसळत असत आणि प्लंजरच्या साहाय्याने ते मिश्रण एकजीव करत असत. अशा प्रकारे तयार केलेले भेसळयुक्त व कृत्रिम दूध हे गायी आणि म्हशीचे अस्सल व शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक स्थानिक डेअऱ्यांना विक्रीसाठी पुरवले जात होते.
लाखो रुपयांचा साठा जप्त आणि अन्नसाठा नष्ट
संबंधित मे. पी. के. डेअरीकडे वैध अन्न सुरक्षा परवानाच उपलब्ध नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तिचा व्यवसाय प्रशासनाने तत्काळ बंद पाडला. या संपूर्ण शोध मोहिमेदरम्यान विविध संबंधित डेअऱ्यांमधून एकूण ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध (ज्याची बाजारभावानुसार किंमत रु. १,८५,७८०/- आहे) जप्त करण्यात आले. हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकत असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी ते जागीच नष्ट करण्यात आले.
याशिवाय, कारवाई दरम्यान १२९.५ किलो पनीर (किंमत रु. ४५,२८०/-), ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर (किंमत रु. १,६०,८२०/-) आणि ८८.४ किलो क्रीम (किंमत रु. ३०,९४०/-) असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासणी मोहिमेदरम्यान मे. पी. के. डेअरीतून ३९३ लिटर म्हशीचे आणि ३६८ लिटर गायीचे असे एकूण ७६१ लिटर संशयित दूध (किंमत रु. ४०,५५८/-) जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच या भेसळ प्रकरणाला दूध व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या मे. भास्कर डेअरी (महापे) येथून ५४८ किलो संशयित पावडर व पनीर (किंमत रु. १,८३,३२०/-) जप्त करून त्यांचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
दुसरीकडे, मे. नारायण डेअरी (रबाळे) कडे कोणतीही मानकीकृत प्रयोगशाळा चाचणी अहवाल नसलेला ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दुधाचा साठा (किंमत रु. १,२४,०३२/-) प्रशासनाने नष्ट केला, तर मे. फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाकडून ८८.४ किलो संशयित क्रीम जप्त करण्यात आले आहे.
१५ जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल
या संपूर्ण रॅकेटप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात २२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रथम खबर अहवाल (FIR क्र. ४३५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या सर्व संबंधित पेढ्यांचे अन्न परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया एफडीएने सुरू केली आहे.
या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल, प्रदीप कमलेश यादव, भास्कर संतु पिलानी यांच्यासह मे. महाराज डेअरी (ऐरोली), मे. विजय डेअरी (घणसोली), मे. शिवकैलास डेअरी (ऐरोली), मे. रूपसागर डेअरी (ऐरोली), मे. दिनेश डेअरी (ऐरोली), मे. बालाजी डेअरी (ऐरोली), मे. शुक्लम् डेअरी (दिघा), मे. श्रीराम डेअरी (कोपरी, ठाणे), मे. वासुदेव डेअरी (कोपरी, ठाणे), मे. राधाकृष्ण डेअरी (कोपरी, ठाणे), मे. जनम डेअरी (साकेत, ठाणे) आणि मे. देवनारायण डेअरी (आझाद नगर, ब्रह्मांड, ठाणे) या १५ व्यक्ती व व्यावसायिकांचा थेट समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही व्यापक कारवाई कोकण विभागाचे सह-आयुक्त (अन्न) अजित मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम, प्रशांत पवार, उत्तरेश्वर बडे, माणिक जाधव आणि एफडीएच्या विशेष गुप्तवार्ता पथकाने संयुक्तपणे यशस्वी केली.
नागरिकांसाठी टोल-फ्री क्रमांक जाहीर
अन्न पदार्थांमधील भेसळ ही नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणारी बाब आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही अन्नपदार्थात, दुधात किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचा अथवा गैरप्रकाराचा संशय आल्यास त्यांनी घाबरून न जाता अन्न व औषध प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ तक्रार किंवा माहिती नोंदवावी, असे आवाहन एफडीएचे सहआयुक्त डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.
Labels: FDA Maharashtra, Milk Adulteration Scam, Navi Mumbai News, Tukaram Mundhe, Crime News, Public Health, Thane FDA
Search Description: FDA Maharashtra busted a major milk adulteration racket at M/s P. K. Dairy in Mahape, Navi Mumbai. Over 4710 liters of fake milk and dairy products seized under Tukaram Mundhe's directives.
Hashtags: #FDAMaharashtra #MilkAdulteration #NaviMumbai #TukaramMundhe #CrimeNews #PublicHealth #ThaneNews #FoodSafety
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: