टेंडरमधील टक्केवारीचा 'मातोश्री पॅटर्न' महाराष्ट्राला सांगा: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला
मुंबई/नाशिक:टेंडरमध्ये २५ टक्के कमिशन घेण्याचा 'मातोश्री पॅटर्न' काय होता, हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मगच 'जामनेर पॅटर्न'वर गप्पा मारा, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. गटारात, टॉयलेटमध्ये आणि खड्ड्यांच्या प्रत्येक कामात पैसे खाण्याचा धंदा आणि कमिशनखोरीची परंपरा उबाठा गटाचीच आहे, असा थेट आरोप करत बन यांनी राऊत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
'मातोश्री पॅटर्नवर दोन-दोन मातोश्री उभ्या केल्या'
नाशिकमधील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, "जनाब संजय राऊत, टेंडरमध्ये २५ टक्के कमिशन घ्यायचा मातोश्री पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याच कमिशनखोरीच्या जोरावर दोन-दोन मातोश्री उभ्या राहिल्या आहेत. खड्ड्यांच्या कामांपासून ते विविध टेंडरपर्यंत कमिशनखोरी आणि खंडणीवसुली हीच तुमची परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे इतरांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचा कमिशनखोरीचा पॅटर्न महाराष्ट्रासमोर उघड करा."
नाशिक महापालिका सक्षम; उबाठा पक्षच खड्ड्यात गेलाय
नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे सक्षम असून तिथे युद्धाच्या पातळीवर काम सुरू आहे, असे बन यांनी स्पष्ट केले. नाशिकची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः घेतली आहे. नाशिकमध्ये जाऊन राजकीय नाटक करण्यापेक्षा उबाठा गटात पडलेले मोठे खड्डे बुजवा आणि अख्खा पक्ष खड्ड्यात गेला आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी राऊत यांना दिला.
संजय राऊत यांच्या कुंभकर्ण उल्लेखाला उत्तर देताना बन म्हणाले, "संजय राऊत, कुंभकर्ण कोण आहे हे सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अहंकानी रावण आहात. महाराष्ट्र लुटून अडीच वर्षे आणि मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्ता भोगून तुम्ही सोन्याची लंका उभी केली आहे. मात्र तुमचा हा अहंकार आणि लंका जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही."
कमिशनखोरी बंद झाल्याने जळफळाट
संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खिशात बसले आहेत, अशी टीका करत बन म्हणाले, "सत्ता गेल्यामुळे आणि कमिशनखोरीची दुकानदारी बंद झाल्यामुळे तुमचा हा जळफळाट सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षमपणे महाराष्ट्राचा कारभार चालवत आहेत. जनतेने तुम्हाला नाकारले असून तुमची स्थिती सुकलेल्या पापडासारखी झाली आहे. नाशिकमध्ये जाऊन आंदोलनाचा आणि मोर्चाचा आव आणण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे आणि मालकाकडे लक्ष द्या."
कुंभमेळा, हिंदू एकता आणि औरंगजेब फॅन क्लबवरून टोला
नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यावरूनही बन यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. कुंभमेळ्यात हजारो साधू-संत आणि लाखो हिंदू एकत्र येणार असल्यानेच संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचे पोट दुखत असल्याचा आरोप त्यांनी केला. "अल्पसंख्याकांच्या दाढ्या कुरवाळणे आणि इज्तेमाला पाठिंबा देणे ही तुमची मानसिकता आहे. मात्र, नाशिकमध्ये एकत्र येणाऱ्या लाखो हिंदूंना बदनाम करण्याची सुपारी तुम्ही घेतली आहे," असा आरोप त्यांनी केला.
जनाबगिरी आणि औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी कुंभमेळा अत्यंत उत्साहात पार पडेल आणि हिंदू समाज विखुरला जाणार नाही, असा विश्वास शेवटी नवनाथ बन यांनी व्यक्त केला.
Labels: Navnath Ban, Sanjay Raut, BJP vs UBT, Matoshree Pattern, Nashik Potholes, Maharashtra Politics, Devendra Fadnavis
Search Description: BJP Spokesperson Navnath Ban launched a fierce attack on Sanjay Raut over the Matoshree commission pattern, Nashik potholes, and Maharashtra political controversy.
Hashtags: #BJP #UddhavThackeray #SanjayRaut #NavnathBan #MaharashtraPolitics #MatoshreePattern #NashikNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: