कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) कार्यालयातील शाखा अभियंता (वर्ग-२) विजयकुमार विलास वनमोरे याला कंत्राटदाराकडून ३८,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. रस्त्यांच्या आणि ब्रिजच्या कामाचे अंतिम बिल मंजूर करून देण्यासाठी या अभियंत्याने लाचेची मागणी केली होती.
कंत्राट आणि लाचेची मागणी
या प्रकरणातील आरोपी लोकसेवक विजयकुमार विलास वनमोरे (वय ५० वर्ष, पद- शाखा अभियंता, वर्ग-२, नेमणूक- सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी, जि. कोल्हापूर, मूळ रा. फ्लॅट नंबर २०५, संजय अपार्टमेंट, कोयना वसाहत, कराड, जि. सातारा, सध्या रा. अकोली रोड, शाहूवाडी) हा शाहूवाडी PWD कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी मार्फत निघणारे रस्ते, गटारी व पुलांची कामे मुख्य ठेकेदाराकडून सब-ठेकेदार (पेटी कंत्राटदार) म्हणून घेऊन पूर्ण करत होते. तक्रारदाराने शिराळे वारूनच्या ब्रिजचे काम व कर्नलवाडी (धनगरवाडा) ते सोनारवाडी (विरळे) गावातील रस्त्याचे २ किलोमीटर अंतराचे मुरमीकरण व खडीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामांचे अंतिम बिल मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता वनमोरे याने तक्रारदाराकडे ३४,७०० रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीकडे तक्रार आणि पडताळणी फेरी
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, कोल्हापूर येथे रीतसर तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबी पथकाने शाहूवाडी येथे भेट देऊन पंचांच्या उपस्थितीत लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान आरोपी वनमोरे याने ब्रिज आणि रस्ता कंत्राटाच्या दोन्ही कामांचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ३८,००० रुपयांची अंतिम लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले.
रंगेहात पकडले आणि गुन्हा दाखल
लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर, १ जुलै २०२६ रोजी शाहूवाडी परिसरात लाचलुचपत पथकाने सापळा कारवाई आयोजित केली. पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून ३८,०००/- रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना आरोपी शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे याला पथकाने रंगेहात पकडले.
तपास यंत्रणा
सदरची धडक कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त/ अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, संदीप काशीद, नायक सचिन पाटील, उदय पाटील आणि चालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली आहे.
Labels :
Kolhapur News,PWD Corruption,Shahuwadi News,Engineer Arrested,ACB Trap KolhapurSearch Description: Shahuwadi PWD Branch Engineer Vijaykumar Vilas Vanmore was arrested by Kolhapur ACB for taking a 38,000 INR bribe for road and bridge work bill clearance.
Hashtags: #KolhapurNews #PWDEngineer #ACBTrap #AntiCorruption #Shahuwadi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: