पुणे (विशेष प्रतिनिधी): जास्त परताव्याचे आमिष दाखवून पुणे परिसरातील गुंतवणूकदारांची सुमारे ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पसार झालेल्या मुख्य आरोपीला सीबीआयच्या प्रयत्नांमुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) प्रशासनाने भारताच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतरपुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले आहे. 'एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी' (APS WEALTH VENTURES LLP) या कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दुबई सरकारने २३ जुलै २०२६ रोजी त्याला भारताच्या ताब्यात दिले, त्यानंतर पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर त्याला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील आरोपीची पत्नी आणि सहसंचालक विशाखा अविनाश राठोड ही अद्याप फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
८८ कोटींच्या फसवणुकीचा असा उघडकीस आला प्रकार
या प्रकरणी बाणेर येथील 'एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी' या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड (दोघे रा. आनंदबन सोसायटी, रावेत, पुणे व मूळ रा. जावळा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. (गुन्हा नोंद क्र. २८१/२०२३, भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ सह महाराष्ट्र वित्तीय संस्थांच्या (गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम - MPID कलम ३ व ४).
आरोपींनी फिर्यादी आणि इतर शेकडो गुंतवणूकदारांना कंपनीत पैसे गुंतवल्यास आकर्षक आणि अवाजवी परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. सुरुवातीला कायदेशीर करार करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र नंतर कराराचा भंग करत गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी मूळ तक्रारदाराचे ८६ लाख ३७ हजार ५०० रुपये आणि इतर गुंतवणूकदारांचे सुमारे ८८ कोटी रुपये बळकावून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
परदेशात पलायन अन् आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड हे कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तात्काळ फरार झाले होते. त्याच्याविरुद्ध इंटरपोलमार्फत 'रेड नोटीस' जारी करण्यात आली होती.सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयाने, इंटरपोलची 'रेड नोटीस' (Red Notice) जारी असलेल्या अविनाश अर्जुन राठोड या आरोपीला संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून भारतात परत आणण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया २३ जुलै २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली. तो २३ जुलै २०२६ रोजी मुंबईत दाखल झाला आणि महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
न्यायालयाने दिली १० दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई विमानतळावरून ताबा घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अविनाश राठोड याला विशेष एमपीआयडी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी, हडप केलेला ८८ कोटींचा निधी कोठे व कसा वर्ग केला याचा माग काढण्यासाठी आणि फरार पत्नीचा पत्ता शोधण्यासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
भारतातील इंटरपोलचे 'नॅशनल सेंट्रल ब्युरो' म्हणून, CBI इंटरपोलच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी भारतातील सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधते. गेल्या काही वर्षांत, इंटरपोलच्या माध्यमातून केलेल्या समन्वयामुळे १७० हून अधिक फरार गुन्हेगारांना यशस्वीरीत्या भारतात परत आणण्यात आले आहे.
Labels:
Pune Crime News,Economic Offences Wing,APS Wealth Ventures Fraud,Avinash Rathod Arrested,Extradited From UAE,Pune Police,MPID ActSearch Description:
Pune Police EOW arrests prime accused Avinash Rathod in the Rs 88 crore APS Wealth Ventures fraud case after extraditing him from UAE. Read full details.
Hashtags:
#PuneCrime#EconomicOffencesWing#PunePolice#FraudCase#Extradition#UAE#MPIDAc
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: