पिंपरी-चिंचवड : आहेर मंगल कार्यालय येथे बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने एकाच व्यासपीठावर १५ पेक्षा जास्त महसुली व नागरी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या शिबिरामध्ये ३,२२५ नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले आणि पेन्शन योजनांचे लाभ एकाच छताखाली थेट वितरीत करण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने आणि विशेष प्रयत्नांमुळे पार पडलेल्या या शिबिराने नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी पायपीट मोठ्या प्रमाणावर थांबवली असून, या उपक्रमाला चिंचवडकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.
शिवरायांच्या विचारांच्या प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना, शिबिरादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा पाया रचला. प्रशासन हे केवळ कार्यालयात फाईल्स हलवणारे नसावे, तर ते सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणारे असावे, हीच शिवरायांची खरी शिकवण आहे. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये या स्वराज्याच्या मुळाशी असलेल्या न्यायानुसार, समाजातील शेवटच्या घटकाचे हित जोपासणे हेच जनप्रतिनिधींचे मुख्य कर्तव्य आहे. याच विचारसरणीतून नागरिकांना चकरा मारण्यास न लावत त्यांना सन्मानाने त्यांचे हक्क व दाखले मिळवून देण्यासाठी हे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार हा अंत्योदय म्हणजेच रांगेत शेवटच्या असलेल्या माणसाचा विकास हाच आहे. याच संकल्पनेतून 'आमदार आपल्या दारी' आणि 'शासन आपल्या दारी' हे उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्याने एकाच छताखाली सात-बारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना थेट मदत सुलभ करण्यात आली आहे. याशिवाय, तुकडेबंदी कायदा आणि पट्टावाटपाच्या धोरणात्मक निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड तसेच प्राधिकरणातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा कायदेशीर व सामाजिक दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठांसाठी विशेष तरतुदी करताना या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी करण्यात आलेली विशेष व्यवस्था होय. अपंग व्यक्ती, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी श्रावण बाळ योजना तसेच वैद्यकीय सुरक्षेसाठी पाच लाखांपर्यंतचे आयुष्यमान भारत कार्ड तत्काळ काढून देण्यात आले. याशिवाय, शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रांसाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी डोमिसाईल, राष्ट्रीयत्व, उत्पन्नाचे दाखले, तलाठी दाखले आणि मंडल अधिकारी यांचे अहवाल एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा वेळ वाचला.
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र महसूल कार्यालयाची ठाम मागणी मांडताना, शहराचा दिवसेंदिवस होणारा अफाट विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी पुण्याच्या किंवा दूरवरच्या शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागतात, असे स्पष्ट करण्यात आले. ही अडचण दूर करण्यासाठी शहरात स्वतंत्र महसूल यंत्रणा उभारणीचा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जगताप यांनी यावेळी ठामपणे सांगितले. मुळशी व हवेली तालुक्यांत विखुरलेली कार्यालये चिंचवडमध्येच आणून तहसील कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, कृषी कार्यालय व अन्नपुरवठा कार्यालय प्रत्येक विधानसभानिहाय स्वतंत्र व्हावे, अशी अत्यंत महत्त्वाची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
थेट लाभांचे विक्रमी वितरण आणि शिबिराचा यशस्वी समारोप या महाराजस्व समाधान शिबिरामध्ये विविध योजनांतर्गत नागरिकांना प्रत्यक्ष लाभ व सेवांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान भारत कार्ड - ७७२, आभा योजना कार्ड - ४९२, एस.आय.आर. - ४३०, रेशनकार्ड सही अर्ज - २७३, तलाठी उत्पन्न दाखले - २०८, संजय गांधी निराधार योजना मंजुरी व पेन्शन - २०८, शालेय उत्पन्न दाखले - १९२, नवीन रेशनकार्ड वाटप - ११५, नोंदणी व मुद्रांक विभाग सेवा - १०७, आवास योजना लाभ - ७७, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र - ७५, नॉन-क्रिमिनल प्रमाणपत्र - ६१, डोमिसाईल दाखले - ४९, संजय गांधी नवीन मंजुरी पत्र वाटप - ४५, रक्तदान शिबीर सहभाग - ४२, जातीचे दाखले - ३२, आधार कार्ड दुरुस्ती व सेवा - २५ आणि नवीन मंजुरीसाठी संजय गांधी अर्ज - २२ अशा एकूण ३,२२५ नागरिकांना लाभ मिळाला.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेविका आशा सूर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर, मनीषा पवार, मनीषा चिंचवडे, कोमल काळे, महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, अपर तहसीलदार डॉ. जयराज देशमुख, नायब तहसीलदार मनीषा माने-लोंढे, मुळशीचे तहसीलदार विनयकुमार चौबे, अन्नपुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, सरचिटणीस मधुकर बच्चे यांच्यासह बिभीषण चौधरी, काळूराम बारणे, सिद्धेश्वर बारणे, तानाजी बारणे, सचिन चिंचवडे, सुधीर वाल्हेकर, गोपाळ माळेकर, आदिती निकम आदी मान्यवर व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर होऊन शासनाचे कल्याणकारी प्रकल्प थेट लोकांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
Labels: Chinchwad Camp, Shrikant Jagtap, Maharajswa Shibir, Pimpri Chinchwad, Government Schemes, Citizen Services
Search Description: MLA Shankar Jagtap organized the Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir in Chinchwad, providing direct government services, Ayushman Bharat cards, and certificates to 3,225 citizens under one roof.
Hashtags: #Chinchwad #ShankarJagtap #MaharajswaShibir #PimpriChinchwad #PublicService #CitizenWelfare
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: