'नेपाळ-बांगलादेशसारखी अराजकता भारतात घडवण्याचा विरोधी पक्षांचा डाव'; भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघाती आरोप
मुंबई (विशेष प्रतिनिधी): देशातील प्रत्येक तरुणाच्या रक्तात देशभक्ती भिनलेली असून इथली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून आहे. मात्र संजय राऊत, शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. या देशातील तरुणांची माथी भडकावून भारतात नेपाळ आणि बांगलादेशसारखी अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधी पक्षांचा डाव आहे. परंतु, त्यांचा हा राजकीय हेतू कधीही यशस्वी होणार नाही, असा प्रहार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. देशात नीट (NEET), एमएच-सीईटी (MH-CET) आणि एमपीएससीच्या (MPSC) मुद्द्यावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय आंदोलनांवर त्यांनी या वेळी जोरदार टीका केली.
संसदेतील चर्चेपासून राहुल गांधींचा पळ
पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, "शिक्षण आणि परीक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार संसदेतही पूर्ण चर्चेला तयार आहे. मात्र, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संजय राऊत हे संसदेतील अर्थपूर्ण चर्चेपासून सातत्याने पळ काढत आहेत. ज्या काँग्रेसला ६० वर्षांत जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवता आले नाही, ते गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत धैर्याने हटवून दाखवले. देशात 'वंदे मातरम्'ची सक्ती होण्यासाठी ७० वर्षे लागली, कारण विरोधकांची निष्ठा राष्ट्रहितापेक्षा इतर घटकांशी जोडलेली होती. अमित शाह यांनी ज्या सक्षमतेने इतर ऐतिहासिक कायदे मंजूर केले, त्याच पद्धतीने पेपरफुटीविरोधातील कठोर विधेयकही पूर्ण ताकदीने राबवले जाईल."
नीट गैरप्रकारातील काँग्रेस कनेक्शन आणि विरोधकांचे मौन
नीट परीक्षा गैरप्रकारावर बोलताना बन यांनी गंभीर आरोप केले. नांदेड येथील प्रकरणात आरोपी मोटेगावकर याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने जाहीर सभेत काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्याशी असलेले आपले संबंध बोलून दाखवले होते. असे असतानाही संजय राऊत किंवा इतर विरोधी नेत्यांनी अमित देशमुख आणि काँग्रेसला याबाबत एकही प्रश्न का विचारला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्ष केवळ निवडक राजकीय सोयीनुसार भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवारांकडून अफवांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांचा गैरवापर
आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना भाजप प्रवक्ते म्हणाले की, "रोहित पवार जाणीवपूर्वक खोट्या अफवा पसरवत आहेत. एमपीएससीचा पेपर फुटल्याचा दावा त्यांनी केला होता, परंतु खुद्द विद्यार्थ्यांनीच असा कोणताही आरोप नसल्याचे स्पष्ट केले आणि एमपीएससीच्या अध्यक्षांनीही यावर पूर्ण खुलासा करून अफवा फेटाळल्या. राहुल गांधींप्रमाणेच महाराष्ट्रात रोहित पवार यांनाही खोटे बोलण्याची सवय झाली आहे. आधी एमपीएससी आणि आता एमएच-सीईटीच्या विद्यार्थ्यांचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात आहे."
पोलिसांवरील हल्ले आणि दडपशाहीचा आरोप फेटाळला
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही असमाजिक घटकांनी घुसखोरी करून पोलिसांवर हल्ले केले आणि धुडगूस घातला. हे सरकार अत्यंत सक्षम असून अशा प्रकारे वातावरण खराब करणाऱ्या किंवा परीक्षेतील गैरप्रकारात दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. राज्य आणि केंद्र सरकार तरुणांच्या भवितव्यासाठी कटिबद्ध असून विरोधकांचे षडयंत्र जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे बन यांनी स्पष्ट केले.
Labels: Navnath Ban, BJP Maharashtra, Sanjay Raut, Rohit Pawar, NEET Scam, MPSC, Maharashtra Politics
Search Description: BJP Chief Spokesperson Navnath Ban slammed opposition leaders Sanjay Raut and Rohit Pawar, accusing them of misleading students and attempting to create Nepal or Bangladesh-like unrest in India.
Hashtags: #NavnathBan #BJP #MaharashtraPolitics #SanjayRaut #RohitPawar #NEET #MPSC #StudentProtest
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: