गुरुवार, ३० जुलै, २०२६

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या लढ्याला यश: अमरावतीच्या सोमेश्वर देवस्थानची ५० कोटींची जमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बिल्डर लॉबीचा डाव उधळला

 

अमरावती | २९ जुलै २०२६ : अमरावती शहरातील भाजीबाजार परिसरातील ऐतिहासिक श्री सोमेश्वर महादेव संस्थानच्या मालकीची तब्बल ५० कोटी रुपये किमतीची मोक्याची १२ एकर शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांमध्ये लाटण्याचा तत्कालीन तहसीलदारांचा बेकायदेशीर आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याविरोधात दिलेला लढा आणि संस्थानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी पूर्ण करत उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला. यामुळे कोट्यवधी रुपयांची देवस्थानची जमीन बिल्डर लॉबीच्या घशात जाण्यापासून वाचली असून सोमेश्वर महादेव देवस्थानची मालकी अबाधित राहिली आहे.

अमरावती येथील भाजीबाजार परिसरात श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ४.८५ हेक्टर (१२ एकर) शेतजमीन आहे. या जमिनीचे चालू बाजारमूल्य ५० कोटी रुपयांहून अधिक आहे. अमरावतीचे तत्कालीन तहसीलदार विजय लोखंडे यांनी २६ सप्टेंबर २०२४ रोजी एक आदेश पारित करून ही मौल्यवान जमीन कुळ कायद्यांतर्गत कब्जेदार सुमन रामरतन कोठार यांच्या नावे अवघ्या ९६० रुपयांमध्ये खरेदी देण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार अत्यंत घाईघाईने खरेदी प्रमाणपत्रही निर्गमित करण्यात आले होते.

तहसीलदारांनी मूळ सुनावणीदरम्यान कोणतीही साक्ष-पुरावे नोंदवले नाहीत, उलटतपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शिल्लक असतानाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र दिले. तसेच सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या नियमानुसार धर्मादाय आयुक्तांची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. ही बाब महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य कोर कमिटी पदाधिकारी अनुप जयस्वाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर महासंघाने या विक्री आदेशास तीव्र विरोध दर्शवला. यानंतर संस्थानच्या वतीने रवींद्र डहाके, अमोल इंगोले व इतर विश्वस्तांनी उपविभागीय अधिकारी (SDO) अमरावती यांच्या न्यायालयात अपील दाखल केले.

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यात आली. सदर शेतजमीन अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत येत असल्याने कुळ वहिवाट अधिनियमाच्या तरतुदीनुसार तिला कुळ कायदा लागूच होत नाही, हा प्रमुख मुद्दा मांडण्यात आला. तसेच श्री सोमेश्वर संस्थान हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेअंतर्गत रीतसर नोंदणीकृत संस्थान असून, संस्थानला २१ ऑगस्ट १९६९ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या 'सुट प्रमाणपत्राची' (Exemption Certificate) प्रत न्यायालयात सादर करण्यात आली.

संस्थानकडे कुळ कायद्यांतर्गत प्राप्त सुट प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचे आणि तहसीलदारांचा आदेश कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संस्थानचे अपील मंजूर केले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी ८ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार तत्कालीन तहसीलदारांचा २६ सप्टेंबर २०२४ रोजीचा बेकायदेशीर निर्णय पूर्णतः रद्द केला. या सुनावणीदरम्यान संस्थानच्या वतीने वकील रमण जयस्वाल यांनी, तर कब्जेदार सुमन रामरतन कोठार यांच्या वतीने वकील ऋषी छाबडा यांनी बाजू मांडली.

सदर शेतजमीन मनपा हद्दीत असल्याने व तिचे बाजारमूल्य ५० कोटींच्या घरात असल्याने सुनावणीदरम्यान संबंधित बिल्डर लॉबी प्रशासकीय स्तरावर अत्यंत सक्रिय असल्याचे दिसून आले होते. मात्र महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा राज्यस्तरावर सातत्याने सुरू ठेवल्याने प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण झाला आणि बिल्डर लॉबीचे मनसुबे उधळून लावण्यात यश आले.

पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयाची माहिती देताना मंदिर महासंघाचे राज्य कोर कमिटी पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी संपूर्ण लढा स्पष्ट केला. या पत्रकार परिषदेला मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, सावंगा विठोबा संस्थानचे सचिव अशोक सोनवाल, जिल्हा समन्वयक सचिन वैद्य, श्रीराम मंदिरचे विश्वस्त हरिभाऊ नानवटकर, श्री विष्णू संस्थांचे मनोज वानखडे, सुरज वानखडे, डॉ. चंद्रशेखर गिरी, सोमेश्वर संस्थांचे विश्वस्त अमोल इंगोले, रवींद्र डहाके व इतर सदस्य उपस्थित होते.

"देवस्थानच्या व मंदिरांच्या जमिनींवर डोळा ठेवणाऱ्या बिल्डर लॉबीला आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा चपराक आहे. मंदिराची एक इंचही जमीन हडप करू दिली जाणार नाही," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे अमरावती शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • Labels: Amravati News, Someshwar Sansthan, Maharashtra Mandir Mahasangh, Land Scam, Builder Lobby, SDO Amravati, Legal Victory

  • Search Description: SDO Amravati cancels illegal order of former Tehsildar selling 12 acres of Someshwar Sansthan temple land worth Rs 50 crore for just Rs 960.

  • Hashtags: #Amravati #TempleLandSaved #SomeshwarSansthan #MandirMahasangh #LandScamBusted #LegalVictory #MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा