शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

 

रत्नागिरी, दि. १९ जून २०२६ :  शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय असून, याला जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि निर्धोक प्रवासासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांनी वेळोवेळी दिलेल्या शासकीय नियमांचे व मार्गदर्शक निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत. रत्नागिरी येथे आयोजित 'जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती'च्या विशेष बैठकीत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या महत्त्वपूर्ण बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, अतिरिक्त अधीक्षक बी. बी. महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, एस.टी. महामंडळ आणि विविध शाळांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध शासकीय विभागांना आणि शाळांना कडक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. शालेय परिवहन समितीच्या माध्यमातून सर्व स्कूल बसेस, व्हॅन व रिक्षांची नोंदणी प्रमाणपत्रे, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस), विमा आणि चालकाचा परवाना (लायसन्स) या सर्व वैध कायदेशीर कागदपत्रांची नियमित व सक्तीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकी संदर्भात माहिती देणारे फलक शाळेच्या वाहनतळावर ठळकपणे प्रदर्शित करावेत आणि वाहनांचे अधिकृत थांबे निश्चित करावेत, अशा सूचना यात देण्यात आल्या. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर तसेच अवैध व धोकादायक पद्धतीने क्षमता ओलांडून वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची 'नोडल अधिकारी' म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

रस्ते सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेताना, जिल्ह्यातील सर्व शाळांसमोरील मुख्य रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश रस्ते विकास यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांच्या परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक (Speed Breakers) आणि रंम्बलर स्ट्रिप्स बसवणे तसेच योग्य ठिकाणी इशारा फलक (Cautionary Boards) लावणे बंधनकारक केले आहे. पोलीस व परिवहन विभागातर्फे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक आणि काटेकोर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांच्या मागणीनुसार आणि वेळेनुसार जादा बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आल्या आहेत. तसेच, शैक्षणिक सहली किंवा क्रीडा महोत्सवांसाठी केवळ अधिकृत स्कूल बसेस अथवा एस.टी. महामंडळाच्या बसेसचाच वापर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहतूक पर्यायांचाच वापर करावा, कोणत्याही अनधिकृत वाहनातून प्रवास करू देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • Labels: School Bus Safety Committee, Ratnagiri District News, Student Transport Guidelines, Nitin Bagate SP Ratnagiri, RTO Ratnagiri Updates 2026

  • Search Description: Ratnagiri District School Bus Safety Committee issues strict transport guidelines and mandates inspection of school vehicles for student safety.

  • Hashtags: #SchoolBusSafety #RatnagiriNews #StudentSafety #RTOMaharashtra #RoadSafetyIndia #AstraNewsNetwork

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई Reviewed by ANN news network on ६/१९/२०२६ ०६:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".